सुब्बा, सिंग, बिनीवाले, गोलंदाज यांनी लावला झेंडा

By Admin | Updated: February 23, 2015 00:16 IST2015-02-22T23:50:13+5:302015-02-23T00:16:25+5:30

‘रग्गेडियन आॅब्स्टॅकल रेस’ : देशविदेशातील साडेतीनशेहून अधिक जणांचा सहभाग; ‘टाइमचिप’चा प्रथमच वापर

Subba, Singh, Biniwale, Bowler's flagged flag | सुब्बा, सिंग, बिनीवाले, गोलंदाज यांनी लावला झेंडा

सुब्बा, सिंग, बिनीवाले, गोलंदाज यांनी लावला झेंडा

कोल्हापूर : लष्करी प्रशिक्षणाप्रमाणेच खडतर १५ किलोमीटर पल्ल्याच्या ‘रग्गेडियन आॅब्स्टॅकल रेस’ या स्पर्धेत धावणे, चिखलातून व तारेखालून जाणे, दोरीच्या साहाय्याने चढाई करणे अशा दऱ्याखोऱ्यांतील आव्हानात्मक रेसमध्ये खुल्या गटात अमर सुब्बा याने, तर महिला गटात शिल्पा सिंग व शालेय गटात अ‍ॅलन गोलंदाज यांनी बाजी मारली.कोल्हापुरातील ‘कासा’ या संस्थेच्यावतीने सादळे-मादळे येथील डोंगरात झालेल्या या अडथळ्यांच्या स्पर्धेत कोल्हापूरसह देश-विदेशातील साडेतीनशेहून स्पर्धकांनी सहभाग घेत स्पर्धेचा थरार अनुभवला. स्पर्धेची सुरुवात सादळे येथील खास तयार केलेल्या सेंटर पॉइंटपासून झाली. प्रथमच अशा पद्धतीचा थरार अनुभवण्यासाठी स्पर्धकांना उत्सुकता होती. या स्पर्धेत एकूण १५ किलोमीटर अंतर स्पर्धकांना पार करावयाचे होते. त्यात धावण्यासह चिखलातून जाणे, याचबरोबर तारेखालून जाणे, दोरीच्या साहाय्याने चढाई करणे, जाळी व टायरच्या अडथळ्यांतून जाणे, १५ किलोंचे पोते उचलून धावणे, आगीवरून उडी मारून जाणे, अशा अनेक विविध आव्हानांना सामोरे जात स्पर्धा पूर्ण करावयाची होती. या स्पर्धेत विविध वयोगट, खुला गट आणि महिलांचा गट तसेच फन गट अशा प्रकारांत ही स्पर्धा घेतली. स्पर्धेत प्रथम सुरुवात झाल्यानंतर हलकीशी थंडी असल्याने स्पर्धकांचा उत्साह दुणावला होता. मात्र, जसजसे ऊन वाढू लागले, तसे स्पर्धकांची चांगलीच दमछाक झाली. स्पर्धा संपूर्णपणे सादळे-मादळेच्या डोंगरदऱ्यांतून झाल्याने प्रथम बघणाऱ्या रसिकांना खाली पाहिले तर धडकीच भरावी, असे चित्र दिसत होते; पण स्पर्धकांनी अशा आव्हानांना तोेंड देत स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी अशा प्रकारचा थरार प्रथमच अनुभवला. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : खुला गट - वयोगट ४५ वरील - अमर सुब्बा (सिक्कीम), उदय महाजन, विश्वास चौगुले.महिला - खुला गट (३६ ते ४५ वय)- शिल्पा सिंग, सुचेता काटे, पल्लवी पिसाळ (दोघींना विभागून द्वितीय), अर्चना देशपांडे.
महिला (४५ वयोगटावरील) - अवंती बिनीवाले, अंजली जाधव.शालेय गट मुले - अ‍ॅलन गोलंदाज, अभिषेक देवकाते, योगेश आडके. मुली - कस्तुरी गोरे, केतकी गोरे, कस्तुरी सावेकर.१६ ते २५ मुले गट - संतोष पाटील, सुनील कोरी, करण गायकवाड
महिलांमध्ये - इंदरजा बेनाडीकर, मृदुल शिंदे, सोनिया यादव.मुले - २६ ते ३५ वयोगट - चैतन्य वेल्हाळ, विशाल शिलीमकर, मायकेल लेहिंग (जर्मनी). खुला गट - ३६ ते ४५ वयोगट - मुले - संदीप काटे, बाळासाहेब पाटील, दिनेशसिंग.
फन गट मुले - किरण पाटील, गौरव जोशी, विनायक कुंभार. मुलींमध्ये - रुची मुक्ती, रुची ओसवाल, अंकिता आमटे.
स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोटचे तहसीलदार गुरू बिराजदार यांच्या हस्ते झाले. यावेळी अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, रवींद्र प्रभू, राहुल गायकवाड, नगरसेवक सत्यजित कदम, कर्नल पी. सी. पवार, आदी उपस्थित होते. स्पर्धा संयोजनात ‘व्हाईट आर्मी’च्या २० जवानांनी स्पर्धकांना मार्ग दाखविणे, जखमींवर औषधोपचार करणे, आदी कामे करून मदत केली; तर टी. ए. बटालियनचे कर्नल पी. सी. पवार, सुभेदार मेजर नरेश चंद्र, सुभेदार तारादत्त, हवालदार उदय वीर यांनी संयोजकांना मार्गदर्शन केले.


या सेलिब्रिटींनीही केली स्पर्धा पूर्ण
जर्मनीतील ‘आयर्न मॅन’ मायकेल लेहिंग, हिमालयात ४४० किलोमीटर धावण्याचा विश्वविक्रम करणारा सिक्कीमचा अमर सुब्बा व दार्जिलिंगचा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू रोशन जी., नृत्यचंद्रिका संयोगीता पाटील, आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला कार ड्रायव्हर चित्तेश मंडोडी यांनी स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. याशिवाय सातारच्या अ‍ॅड. कमलेश पिसाळ यांची बायपास
सर्जरी झाली आहे. त्यांच्यासह ४० वर्षांवरील पाच महिलांनीही स्पर्धा पूर्ण करत हम किसीसे कम नही हे दाखवून दिले.


टाइमचिपचा प्रथमच वापर
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाच्या टी शर्टवर संयोजकांच्यावतीने टाइमचिप लावली होती. स्पर्धा सुरू झाल्यानंतर या चीपमुळे त्या स्पर्धकाने स्पर्धा किती वेळात पूर्ण केली याची माहिती संयोजकांना कळण्यास मदत झाली.


ंं‘हेलिकॅम’चा वापर
स्पर्धेचा मार्ग दऱ्याखोऱ्यांतील अडथळ्यांचा व आव्हानात्मक असल्याने संयोजकांनी स्पर्धकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याकरिता हेलिकॅम कॅमेऱ्याचा वापर करीत स्पर्धेवर नियंत्रण ठेवले.

अशी स्पर्धा दरवर्षी व्हावी
अशा पद्धतीचा रग्गेड अनुभव देणारी आव्हानात्मक स्पर्धा कोल्हापूरसारख्या ठिकाणी संयोजकांनी भरवून कोल्हापूरकरांसह देशातील दिग्गजांना वेगळा अनुभव दिला. त्यामुळे अशी स्पर्धा दरवर्षी भरवावी.
- चित्तेश मंडोडी
आंतरराष्ट्रीय फॉर्म्युला कार ड्रायव्हर

आतापर्यंत १२ तास सलग धावण्याची स्पर्धा यशस्वीरीत्या पार केली. मात्र, अशा प्रकारची वेगळी व साहसी अनुभव देणारी स्पर्धा आपण प्रथमच
अनुभवतो आहोत. हा अनुभव मनाला चांगला वाटला. यापुढील स्पर्धेत आमची संपूूर्ण टीम सहभागी
होईल.
- रोशन. जी
आंतरराष्ट्रीय धावपटू (दार्जिलिंग)

Web Title: Subba, Singh, Biniwale, Bowler's flagged flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.