तब्बल २५ रस्त्यांवर रंगणार स्टंटचा थरार
By Admin | Updated: December 31, 2016 05:20 IST2016-12-31T05:20:30+5:302016-12-31T05:20:30+5:30
मुंबईतील हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट, समुद्रकिनारे, चौपाट्यांवर न्यू ईअरच्या स्वागतासाठी तरुणाईचे प्लॅनिंग सुरू असतानाच मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल २५ ठिकाणी मोटारसायकल

तब्बल २५ रस्त्यांवर रंगणार स्टंटचा थरार
- मनीषा म्हात्रे, मुंबई
(येथे लागते मृत्यूशी पैज, भाग-१)
मुंबईतील हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट, समुद्रकिनारे, चौपाट्यांवर न्यू ईअरच्या स्वागतासाठी तरुणाईचे प्लॅनिंग सुरू असतानाच मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल २५ ठिकाणी मोटारसायकल रेसिंगच्या थरारक स्पर्धा लावण्यात आल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. बाइकवेड्या तरुणांकडून याची सर्व तयारी पूर्ण झाली असून धूम चित्रपटात थर्टी फर्स्टच्या रात्री दाखविलेल्या चोरीच्या थराराप्रमाणेच मुंबईतील रेसिंगची ठिकाणे शोधा, आमचा पाठलाग करा आणि आम्हाला धूम स्टाईलने पकडा... असे आव्हानच मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर बाइक रेसिंग, बाइकचे स्टंट हे काही नवीन नाही. परंतु कारवाई करत स्टंटबाजी आणि रेसिंग बंद करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येतो. या दाव्याची पोलखोल ‘लोकमत’ने केली आहे. मुंबईतील काही रस्तेच राजकीय मंडळींनी बाइकचे स्टंट करण्यासाठी खासकरून बनवून घेतले आहेत. आयोजकांकडून या ठिकाणी बाइक रेसिंग, स्टंटबाजीचे आयोजन करण्यात येते. यामध्ये राजकीय नेते, कलाकार आणि एका नामांकित मोबाइल कंपनीच्या मालकाचे पैसे लागणार आहेत. यासाठी एका टीममागे ५० हजार रुपये लावण्यात आले असल्याची माहिती यामध्ये सहभागी झालेल्या रेसर्सने ‘लोकमत’ला दिली. याची आगाऊ रक्कमही अनेक बायकर्सना मिळाली आहे.
सुपर बाइक रेसिंग, अॅक्टिव्हा रेसिंग, कपल्स बाइक रेसिंग, अशा प्रकारात हे रेसिंग आणि स्टंटबाजी करण्यात येणार आहे. यासाठी गाड्या बनविण्याची तयारी गॅरेजमध्ये सुरू आहे. फॉरेन्स रेसिंग बाइकचे पार्ट तसेच पल्सर २२०, डीओ, केटीएम, यामहा, अॅक्टिव्हा या बाइक्समध्ये पोर्ट करत रेसिंग बाइक तयार करण्यात येत आहे. यात ५ हजारच्या कार्बोरेटरऐवजी २० हजारांचा कार्बोरेटर बसविण्यात येतो. जेणेकरून ती वेग पकडेल. शिवाय त्यामुळे १ लीटरमागे ही बाइक ५ ते ६ किमी धावते. शिवाय याचा सायलेन्सरचा मफलर काढण्यात येतो. जेणेकरून त्याचा आवाज वाढतो, अशी माहिती रेसिंग बाइक बनविण्यात स्पेशालिस्ट असलेले मेकॅनिक कन्नन नायडू याने दिली. आम्ही ज्या ठिकाणी अधिकृत रेसिंग होतात, त्याच ठिकाणी रेसिंगच्या बाइक बनविण्यासाठी जातो. मात्र सध्याच्या घडीला रायडर बाइक मेकॅनिकचे प्रमाणपत्र नसतानाही मेकॅनिक मंडळी मोठ्या प्रमाणात अशा बाइक्स बनवून देत आहेत.
बाइक रेसिंग, स्टंटबाजीच्या जागा शोधा, जागा शोधल्यात तर आमचा धूम स्टाईलने पाठलाग करा आणि आम्हाला पकडा.. असे आव्हान या रेसर्सकडून थर्टी फर्स्टच्या रात्री पोलिसांनाच देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांसोबतच रेसिंगची एक वेगळी स्पर्धा थर्टी फर्स्टच्या रात्री अनुभवायला मिळणार आहे.-
महिन्याभरापासून तयारी
- मुंबईतल्या गॅ्रण्ट रोडसह बंगळुरू, चेन्नई, चायना, इंडोनेशिया येथून या बाइक्ससाठी विविध पार्ट मागविण्यात येतात.
- एका बाइकसाठी ३० हजारांहून १० लाखांपर्यंत पैसे मोजण्यात येत आहेत. त्यामुळे मेकॅनिकचा धंदाही जोर धरताना दिसला. महिन्याभरापासून या बायकर्सने मुंबईच्या वेशीबाहेर तयारी केली होती.