...तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही होईल बिकट
By Admin | Updated: June 7, 2015 01:55 IST2015-06-07T01:55:40+5:302015-06-07T01:55:40+5:30
राज्यातील उपलब्ध पाण्याचे शेती आणि उद्योगांसाठीचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही बिकट होईल

...तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही होईल बिकट
मुंबई : राज्यातील उपलब्ध पाण्याचे शेती आणि उद्योगांसाठीचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही बिकट होईल, असा इशारा मॅगसेसे विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनी शनिवारी येथे दिला. राज्यातील पाण्याचे
दुर्भीक्ष लक्षात घेता पीक पद्धतीत आमुलाग्र बदल करण्याची गरज असून, त्यासाठी येथील नेतृत्वाने राजकीय इच्छाशक्ती दाखविली पाहिजे, असे ते म्हणाले.
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या दोन वर्षांत राज्यात सूक्ष्म सिंचनावर २ हजार ७०० कोटी रुपये खर्च झाले. मात्र, त्या मानाने सिंचन झालेले दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यातील धरणे ही गाळाने भरली असल्याने पावसाचे पाणी झिरपण्याची प्रक्रियाच थांबली आहे. नद्या, विहिरी, बोअरवेल्स कोरड्या पडत आहेत. परिणामत: पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे, असे ते म्हणाले.
राजेंद्रसिंह यांनी नद्याजोड प्रकल्पावर टीका केली. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना चांगली आहे पण या योजनेत कंत्राटदार घुसू देऊ नका, असा इशारा
देऊन राजेंद्रसिंह म्हणाले की, या योजनेचे चांगले परिणाम दिसण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. (विशेष प्रतिनिधी)