खोपोलीमध्ये राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष, २४० खेळाडूंचा सहभाग, कोल्हापूर विभाग सांघिक विजेता, पुणे विभाग उपविजेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 06:33 IST2025-11-10T06:33:36+5:302025-11-10T06:33:59+5:30
State-Level School Wrestling Tournament : खोपोलीतील काशी स्पोर्टस सेंटर येथे १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जल्लोषात पार पडली. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील २४० मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

खोपोलीमध्ये राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष, २४० खेळाडूंचा सहभाग, कोल्हापूर विभाग सांघिक विजेता, पुणे विभाग उपविजेता
खोपोली - खोपोलीतील काशी स्पोर्टस सेंटर येथे १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जल्लोषात पार पडली. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील २४० मुलामुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. फ्रीस्टाइल आणि ग्रेको-रोमन पद्धतीच्या विविध वजनी गटांत सामने रंगले. या स्पर्धेत कोल्हापूर विभाग सांघिक विजेता, तर पुणे विभाग उपविजेता ठरला.
भव्य स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी काशी स्पोर्टसचे अध्यक्ष विक्रम साबळे, डॉ. समर्थ मनुकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, तसेच रायगड जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक निळकंठ आखाडे प्रमुख उपस्थित होते. कुस्ती क्रीडा प्रकाराला अधिक चालना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन परेश ठाकूर यांनी दिले.
स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास आणि काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. स्पर्धा प्रमुख राजाराम कुंभार, निरीक्षक संदीप वांजळे व दत्ता माने, तसेच तांत्रिक प्रमुख जगदीश मरागजे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा उचलला.
मुलींची सुवर्ण कामगिरी
कोल्हापूर विभागाच्या मुलींनी ६ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य पदके मिळवत सांघिक विजेतेपद पटकावले, तर मुलांनी ६ सुवर्ण, ३ रौप्य, ७ कांस्य पदकांसह वर्चस्व गाजविले. पुणे विभागाच्या मुलींनी ३ सुवर्ण, ४ रौप्य, १ कांस्य आणि मुलांनी ४ सुवर्ण, ४ रौप्य, ६ कांस्य पदकांसह सांघिक उपविजेतेपद मिळवले.
'महाराष्ट्राचे द्रोणाचार्य' सन्मान
स्पर्धेच्या आयोजनात कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यास व काशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या सर्व सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले. हेल्प फाउंडेशनने उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था पुरवली.
स्पर्धा आयोजन समितीच्या वतीने कुस्ती क्रीडाप्रकारात आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणाऱ्या प्रशिक्षकांचा 'महाराष्ट्राचे द्रोणाचार्य' असा विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेदरम्यान मानकरी प्रशिक्षकांमध्ये दादा लवटे, संदीप पाटील, संदीप पठारे, अमोल यादव, नागेश राक्षे, किरण मोरे, संपती येळकर, विजय चव्हाण आणि दिवेश पालांडे यांचा गौरव करण्यात आला.