राजकीय ‘डाव’खरे पर्वाचा अस्त

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30

शिवसेना, भाजपामधील मित्रांच्या मदतीने आपले राजकीय ‘डाव’खरे करणारे राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना पराभूत करून शिवसेनेने ठाण्यातील डावखरे पर्व संपुष्टात आणले.

State 'left' | राजकीय ‘डाव’खरे पर्वाचा अस्त

राजकीय ‘डाव’खरे पर्वाचा अस्त

अजित मांडके,

ठाणे- आजवरच्या चार निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजपामधील मित्रांच्या मदतीने आपले राजकीय ‘डाव’खरे करणारे राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांना पराभूत करून शिवसेनेने ठाण्यातील डावखरे पर्व संपुष्टात आणले.
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडे ११९ असे ४२१ मतांचे बळ डावखरेंकडे होते. याचा अर्थ डावखरेंच्या विजयाची भिस्त पूर्णपणे बविआवर होती. शिवसेनेचे ३११, भाजपा १८० अशी ४९१ मते युतीकडे होती. उरलेल्या मतांमध्ये रिपाइंचे ८, अपक्ष ४८, मनसे २०, बसपा ५, सपा १७, एमएमआय १, कोणार्क विकास आघाडी ७, सेक्युलर अलायन्स आॅफ इंडिया ४ आणि डाव्यांची ५ मते होती.
मतमोजणीअखेर डावखरेंच्या पारड्यात ४५० मते पडली. याचा अर्थ डावखरे यांना अतिरिक्त २९ मते मिळाली तर फाटकांच्या पारड्यात ६०१ मते पडली. याचा अर्थ फाटकांनी त्यांच्याकडील मते सांभाळून बाहेरून ११० मते मिळवली. फाटक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व बविआची मते खेचली असतील, तर तो डावखरे यांच्याकरिता मोठा धक्का असेल. ठाण्यासकट नवी मुंबई आणि वसई-विरार पट्ट्यात शिवसेनेने मतांची आघाडी घेतल्याचे सांगण्यात येते.
>डावखरे एकाकी लढले
डावखरे यांच्या प्रचाराकरिता ठाण्यात आलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनीदेखील निवडणुकीची सर्वच गणिते आमच्या बाजूने नसल्याचे सूचक वक्तव्य केले होते. जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक हे पक्षातील नेते डावखरे यांच्यासोबत नव्हते. मतमोजणीच्या दिवशीदेखील त्यांच्यासोबत पक्षातील नेते नव्हते.
ज्या शिवसेनेने डावखरे यांना नेहमी साथ दिली, त्याच शिवसेनेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यांच्या पराभवामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाणे राष्ट्रवादीत ‘डावखरे गट’ दिसणार की, त्यांचे समर्थक स्वपक्षीय नेते किंवा अन्य पक्षात आसरा घेणार, ते येणारा काळ ठरवेल, असे बोलले जात आहे.

Web Title: State 'left'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.