राज्य सरकारने आता जेवणासाठी रेस्टॉरंट्स खुली करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 14:40 IST2020-09-23T14:30:29+5:302020-09-23T14:40:37+5:30
मुंबईसह महाराष्ट्रात या व्यवसायावर पाच लाखांहून अधिक जणांचे कुटुंबे अवलंबून आहेत.

राज्य सरकारने आता जेवणासाठी रेस्टॉरंट्स खुली करावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन
पुणे : राज्यातील रेस्टॉरंट्समधून आजमितीला फक्त पार्सल सेवा सुरु आहे. परंतु, ती तितकी पुरेशी नाही. रेस्टॉरंट व्यावसायिकांना त्यातून फारसे उत्पन मिळत नाही. मुंबईसह महाराष्ट्रात या व्यवसायावर पाच लाखांहून अधिक जणांचे कुटुंबे अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे फिरतीवर असणाऱ्या अनेक नागरिकांकरिता रेस्टॉरंटमधील जेवण सुरु होणे आवश्यक आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जेवणासाठी रेस्टॉरंट्स सुरु करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. आता राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना लॉकडाऊनकाळात रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद होती. मात्र त्यानंतर अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात पार्सल सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात जेवणासाठी रेस्टॉरंट्स खूली करण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा चाळीस टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सरकारने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून रेस्टॉरंट्स चालू केली जावीत. सामायिक अंतर राखावे, वस्तू हाताळण्यापूर्वी निर्जंतुकीकरण व्हावे, आदी नियमांसाठी तसेच कर्मचारी आणि ग्राहक यांच्या आरोग्याची दक्षता घेण्याबाबत रेस्टॉरंट व्यवसायिकांनी तयारी दर्शविली आहे. सरकारने त्याप्रमाणे कडक बंधनेही घालावी. मात्र, आता लवकरात लवकर गेले सहा महिने या व्यवसायाची सुरू असलेली कोंडी दूर व्हावी. रेस्टॉरंट व्यवसायावर दूध, भाजीपाला, धान्य पुरवठादार आदी व्यापारी अवलंबून असतात. रेस्टॉरंट्स खुली केल्यास त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल, कराद्वारे सरकारचे उत्पन्न वाढेल.
सरकारने खाजगी बससेवा, लॉजेस, एसटी बससेवा यांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे रेस्टॉरंट्सचाही विचार व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.