शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 07:23 IST2025-08-29T07:22:55+5:302025-08-29T07:23:53+5:30
Shaktipeeth Highway: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सांगली या आखणीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता पुढील मार्गाच्या आखणीचे कामही अंतिम टप्प्यात असून त्याची अधिसूचनाही लवकरच काढली जाणार आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
मुंबई - नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सांगली या आखणीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आता पुढील मार्गाच्या आखणीचे कामही अंतिम टप्प्यात असून त्याची अधिसूचनाही लवकरच काढली जाणार आहे.
राज्य सरकारने कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगढ आणि आजरा तालुक्यातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द केली होती. त्यामुळे त्यावेळी या प्रकल्पाला विरोध मावळला होता. आता जूनमध्ये पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. त्यात भूसंपादनसाठी हुडकोकडून १२ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. आता राज्य सरकारने या प्रकल्पासाठी शासन आदेश जारी पवनार ते सांगली या मार्गास मंजूरी दिली आहे. तर कोल्हापूरमधील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड आणि आजरा तालुक्यातील आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या पर्यायांबाबत जिल्ह्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गाच्या अंतिम आखणीचा निर्णय घेतील, असे जीआरमध्ये म्हटले आहे. शेवटच्या टप्प्यातील मार्गाच्या आखणीचे कामही पूर्ण केले आहे. या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो सरकारला सादर केला जाणार आहे, असे एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी नमूद केले.
१५० हून अधिक गावांची एमएसआरडीसीतर्फे मोजणी
एमएसआरडीसीने वर्धा ते सांगलीदरम्यानच्या ३७० गावांपैकी १५० गावांतील जमीनीची संयुक्त मोजणी पूर्ण केली आहे. उर्वरित गावांच्या मोजणीचेही काम युद्धपातळीवर सुरू असून, ही मोजणी प्रक्रिया पूर्ण होताच भूसंपादन सुरू केले जाणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाची निविदाप्रक्रिया राबविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
नागपूर ते गोवा हे अंतर २१ तासांवरून आठ तासांवर येणार
१२ जिल्ह्यातून मार्ग जाणार
मार्गाची लांबी ८०२ किमी असेल,
या जिल्ह्यातून मार्ग प्रस्तावित
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंथदुर्ग हे १२ जिल्हे जोडले जातील.