एसटी संपावर तोडगा नाही! कर्मचाऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 14:35 IST2021-11-10T14:34:07+5:302021-11-10T14:35:45+5:30
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आगारांमधून एसटी निघालेल्या नाहीत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत.

एसटी संपावर तोडगा नाही! कर्मचाऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील प्रकार
कोल्हापूर
एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आगारांमधून एसटी निघालेल्या नाहीत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलीनीकरण करावं अशी मागणी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. यातच कोल्हापुरातील आज मध्यवर्ती बसस्थानकात धक्कादायक प्रकार घडला. गगनबावडा आगारातील सदानंद कांबळे नावाच्या कर्मचाऱ्यानं आगारातच गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
सदानंद कांबळे नावाचा कर्मचारी गळफास लावून आत्महत्या करत असतानाच उपस्थित कर्मचाऱ्यानं प्रसंगावधान दाखवत कर्मचाऱ्याला वाचवलं. दुसरीकडे राज्य सरकार आता संपाबाबत आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांनी समितीसमोर म्हणणं मांडावं. कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई लढू नये असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.