कोकणात २१ ऑगस्टपर्यंत एसटी जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 08:03 IST2020-08-11T08:03:02+5:302020-08-11T08:03:14+5:30
१३ तारखेनंतर प्रवासासाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह येणे बंधनकारक

कोकणात २१ ऑगस्टपर्यंत एसटी जाणार
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता २१ आॅगस्टपर्यंत एसटी धावणार आहे. मात्र १३ आॅगस्टनंतर प्रवास करणाऱ्यांना कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य आहे. चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना प्रवास करता येईल.
कोकणात जाण्यासाठी एसटीने ६ आॅगस्टपासून बस सुरू केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत तब्बल दहा हजार प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. योग्यरीत्या सॅनिटाइझ केलेल्या बस महामंडळाने प्रवासासाठी उपलब्ध केल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रवाशांना प्रवासामध्ये सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रवासामध्ये केवळ महामंडळाच्या अधिकृत ठिकाणीच पिण्याचे पाणी व नैसर्गिविधीसाठी वाहने थांबविण्याची दक्षता महामंडळाने घेतली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्या भोजनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वत: करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
...तर तिकीट रद्द नाही
मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांवर बस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. १३ आॅगस्टनंतरच्या प्रवासासाठीचे आगाऊ आरक्षण सोमवारपासूनच सुरू झाले आहे. मात्र प्रवाशाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही.