एसटी प्रवास महागला, १५ टक्के भाडेवाढ लागू; मुंबई-पुणे तिकीट ८० रुपयांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 08:30 IST2025-01-25T08:29:45+5:302025-01-25T08:30:18+5:30
ST Bus News: राज्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचणाऱ्या ‘लालपरी’च्या प्रवाशांना शुक्रवारी जबरदस्त ‘शॉक’ बसला. एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्क्यांच्या भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला आहे.

एसटी प्रवास महागला, १५ टक्के भाडेवाढ लागू; मुंबई-पुणे तिकीट ८० रुपयांनी वाढले
मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचणाऱ्या ‘लालपरी’च्या प्रवाशांना शुक्रवारी जबरदस्त ‘शॉक’ बसला. एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्क्यांच्या भाडेवाढीचा निर्णय घेत हा प्रवास आता महाग केला आहे. या भाडेवाढीमुळे साध्या बसचे एका टप्प्यासाठीचे दर ८.७० वरून १०.०५ रुपयांवर, एसीचे दर २२ वरून २५.३५ रुपयांवर पोहोचले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे.
महामंडळाने यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये भाडेवाढ केली होती. , सध्या एसटीला प्रतिकिमी ३.४१ रुपये याप्रमाणे महिन्याला अंदाजे २ कोटींचा तोटा होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे भाडेवाढ अपरिहार्य झाली होती. त्यानुसार संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली. एसटीकडून सध्या ६ किमी अंतराच्या एका टप्प्यानुसार भाडे आकारणी केली जाते. अपघाती विम्याच्या हप्त्याची रक्कम आधीप्रमाणेच पहिल्या टप्प्याच्या भाड्यामध्ये आकारली जाणार आहे. ही रक्कम १ रुपया असेल.
गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झालेली नाही. एसटीचा तोटा महिन्याकाठी ९० कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत भाडेवाढीशिवाय पर्याय नव्हता. जुन्या योजना बंद होणार नाहीत. लाडक्या बहिणींना ५० टक्के सूट
कायम राहील.
- प्रताप सरनााईक, परिवहनमंत्री