एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक सफल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 22:07 IST2018-06-09T21:52:16+5:302018-06-09T22:07:56+5:30
दोन दिवसांनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक सफल
मुंबई: पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मिटवण्यात अखेर राज्य सरकारला यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर सर्व कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर संघटनांनी संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक अशी 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर केल्याचं दिवाकर रावतेंनी बैठकीत सांगितलं. 'ऐतिहासिक वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. मात्र याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. कर्मचाऱ्यांनी असं न करता आपली वेतनवाढ नेमकी किती झाली, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. सर्व कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेला बेकायदेशीर संप मागे घेऊन तातडीने कामावर रुजू व्हावं', असं आवाहन मंत्री रावते यांनी केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी संपादरम्यान केलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांवर कारवाई होईल. इतर कारवाईतून त्यांना मुक्त करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी अचानक सुरू केलेला संप मागे घ्यावा, असं आवाहन रावतेंनी पदाधिकाऱ्यांनी केलं. या आवाहनाला संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं.