सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:29 IST2025-07-30T19:15:31+5:302025-07-30T19:29:07+5:30
सध्या दररोज एसटी महामंडळाला सरासरी १०.७८ लाख लिटर डिझेल लागते

सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा केला जातो. त्यांच्याकडून एसटी बसेसना पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनाला सवलतीचा दर लावला जातो. याच सवलतीमध्ये (Discount rate) १ ऑगस्टपासून प्रति लिटर ३० पैशाची वाढ करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता एसटी प्रशासनाचे दिवसाला सरासरी ३ लाख २३ हजार रुपये म्हणजे वर्षागणिक अंदाजे ११ कोटी ८० लाख रुपये इतकी बचत होणार आहे.
गेल्या ७० वर्षांपेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ हे इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याकडून डिझेल इंधन खरेदी करत आहे. सध्या दररोज एसटी महामंडळाला सरासरी १०.७८ लाख लिटर डिझेल लागते. एसटी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा खरेदी ग्राहक (bulk purchase customer) असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या. परंतु एसटी महामंडळाने वारंवार विनंती करूनही कित्येक वर्ष या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता. अखेर, परिवहन मंत्र्यांची शिष्टाई कामी आली. त्यांनी याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली.
इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन-चार बैठका घेण्यात आल्या. तसेच डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खाजगी कंपन्यासोबतही वाटाघाटी करण्यात आल्या. स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी ठेवण्यात आली. परिणामी, संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार येत्या १ ऑगस्टपासून मुळ सवलत दरात प्रति लिटर ३० पैसे वाढ करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे.
सध्या एसटीच्या २५१ आगारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सहाय्याने दररोज सरासरी १०.७८ लाख लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून पुरविण्यात येते. भविष्यात वाढत्या बसेसच्या संख्येमुळे डिझेल इंधनाची खपत देखील वाढणार आहे. त्यामुळे प्रति लिटर ३० पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे १२ कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी पैशाची बचत करणे शक्य आहे, त्या ठिकाणी काटकसर केली पाहिजे. तसेच तिकीट विक्रीच्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतर स्त्रोतदेखील निर्माण करणे गरजेचे आहे. या दोन्ही प्रयत्नातून भविष्यात एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.
-परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक