एसटीच्या सवलतींचा महाराष्ट्रातील १८१ कोटी प्रवाशांना लाभ, ६,४९५ कोटींची सवलत; महामंडळाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:26 IST2025-04-17T09:24:06+5:302025-04-17T09:26:04+5:30
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी विविध योजना सुरू केल्या असून त्यातील अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सुरू केलेल्या विशेष सवलत योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

एसटीच्या सवलतींचा महाराष्ट्रातील १८१ कोटी प्रवाशांना लाभ, ६,४९५ कोटींची सवलत; महामंडळाची माहिती
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सन्मान योजनेच्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये आतापर्यंत ६ हजार ४९५ कोटी ५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. या सवलतींचा आतापर्यंत १८१ कोटी ६२ लाख प्रवाशांनी लाभ घेतला असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी विविध योजना सुरू केल्या असून त्यातील अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी सुरू केलेल्या विशेष सवलत योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.
एसटी महामंडळाच्या विविध योजना
एसटी महामंडळाच्या एकूण ३३ पेक्षा अधिक योजना अधिक आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, विद्यार्थ्यांना पासमध्ये सवलत, पत्रकारांना सवलत अशा विविध योजनांचा त्यामध्ये सहभाग आहे.
योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ
राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि सर्व महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना या महत्त्वपूर्ण योजना अनुक्रमे २६ ऑगस्ट २०२२ आणि १७ मार्च २०२३ रोजी लागू करण्यात आल्या आहेत.
या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.