लालपरी पुन्हा सुसाट! ९० टक्के कर्मचारी रुजू, ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:16 AM2022-04-23T07:16:15+5:302022-04-23T07:16:57+5:30

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली.

ST Bus on the road again! 90 per cent staffing on the duty, 85 per cent transport Smooth | लालपरी पुन्हा सुसाट! ९० टक्के कर्मचारी रुजू, ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर

लालपरी पुन्हा सुसाट! ९० टक्के कर्मचारी रुजू, ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर

googlenewsNext

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेले एसटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कामावर रुजू होत आहेत. शुक्रवारी, अल्टिमेटमच्या शेवटच्या दिवशी ५,३९८ कर्मचारी रुजू झाले. आता एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले असून,  उपस्थित कर्मचाऱ्यांचा आकडा ८२,२६० वर पोहोचला आहे. त्यामुळे एसटीची ८५ टक्के वाहतूक पूर्वपदावर आली आहे. 

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यांतील प्रवासीवर्ग एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीच्या चालक- वाहकांना आर्थिक लाभ मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाचे राज्यभरातील चालक-वाहक दिवाळीपासून बेमुदत संपावर होते. प्रवाशांची गैरसोय होत असून, ती टाळण्यासाठी कामावर रूजू व्हा, असा आदेश हायकोर्टाने दिला हाेता.

बडतर्फ कर्मचाऱ्यांना करावे लागेल अपील -
- या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यामुळे  एसटी महामंडळाने कारवाई करत १०,३०८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते.  आता या कर्मचाऱ्यांना अपील करावे लागेल. 
- त्यांची सुनावणी झाल्यानंतरच या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेतले जाईल. २२ एप्रिलपर्यंत ९,५७७ अपिले आली असून, त्यापैकी ४,७०१ अपिले निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या अपिलाची प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण झाल्यानंतर तेही रुजू हाेतील.

चार हजार कर्मचाऱ्यांनी शोधला पर्याय : एसटी कर्मचाऱ्यांचा पाच महिने संप सुरू होता. या काळात तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांनी अन्य नोकरी शोधली आहे किंवा व्यवसाय सुरू केला आहे. असे तीन ते चार हजार कर्मचारी असून, ते कामावर परतणार नाहीत, अशी माहिती एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

एसटीच्या फेऱ्या वाढल्या 
एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर परतले असून, कर्मचारी वाढल्याने एसटीच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत...
२७,५६९ - एसटी 
२५,७४९ - साधी 
१८६ - शिवनेरी
२८६ - हिरकणी  
४३५ - शिवशाही
फेऱ्यांचा समावेश आहे.

उपस्थिती लवकरच १०० टक्क्यांपर्यंत जाईल
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मोठ्या संख्येने एसटीचे कर्मचारी त्या त्या आगारांमध्ये कामावर रुजू झाले आहेत. सध्या ८५ टक्के वाहतूक सुरू असून,  लवकरच १०० टक्क्यांपर्यंत जाईल.  ग्रामीण भागातील आणि लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. एसटी पूर्वपदावर आली असून, राज्यातील  प्रवाशांनी आता त्याचा लाभ घ्यावा. 
    - शेखर चन्ने,  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय 
    संचालक, एसटी महामंडळ 

Web Title: ST Bus on the road again! 90 per cent staffing on the duty, 85 per cent transport Smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.