E-Bus Pass ST News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक म्हणाले की, या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील ४४८ बस आणि शिवाई प्रकल्पातील ५० ई-बसेस कार्यरत आहेत. भविष्यात या बसेसची संख्या आणखी वाढवण्याचा मानस आहे.
अनेक प्रवाशांकडून ई-बस सेवेत पास प्रणालीची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महामंडळाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा प्रवास देण्यासाठी ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पास योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्ये
उपलब्धता : ९ मीटर ई-बस, १२ मीटर ई-बस आणि ई-शिवाई सेवेमध्ये हे पासेस उपलब्ध असतील. (ई-शिवनेरी बससेवा वगळून)
मासिक पास:(३० दिवस): २० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ३० दिवसांसाठी पास दिला जाईल.
त्रैमासिक पास: (९० दिवस): ६० दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून ९० दिवसांचा पास उपलब्ध होईल.
सेवा वर्गातील लवचिकता : उच्च सेवा वर्गाचा पास (ई-बस) वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमध्येही प्रवास करू शकतील.
फरक भाडे नियम: निमआराम किंवा साध्या बसच्या पासधारकांना ई-बसने प्रवास करायचा असल्यास, दोन्ही सेवांतील भाड्यातील फरक १००% दराने भरून तिकीट घेऊन प्रवास करता येईल.
दरम्यान, महामंडळाच्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी ई-बसचा वापर वाढण्यास मदत होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Maharashtra State Transport (ST) introduces monthly and quarterly pass for e-bus passengers. Aimed at frequent travelers, these passes offer cost-effective travel on e-buses, promoting eco-friendly commuting, said Pratap Sarnaik.
Web Summary : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) ने ई-बस यात्रियों के लिए मासिक और त्रैमासिक पास शुरू किए। प्रताप सरनाईक ने कहा, इसका उद्देश्य लगातार यात्रियों को ई-बसों में किफायती यात्रा प्रदान करना और पर्यावरण के अनुकूल यात्रा को बढ़ावा देना है।