लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लहान वयातच ‘अनहेल्दी’ पदार्थ सेवन केल्यास मुलांच्या वाढीवर, आरोग्यावर दुरगामी परिणाम दिसून येतात. शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून ८ मे २०१७ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, शाळांच्या उपहारगृहात ‘एचएफएसएस फूड’ (जास्त प्रमाणात फॅट, साखर, मीठ असणारे पदार्थ आणि पेय) ठेवण्यास व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली. शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन घेतलेल्या या निर्णयाची मात्र मुंबईतील शाळांमध्ये पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत रिअॅलिटी चेक’मधून उघड झाले. काही शाळांनी जंक फूड बंद केले असले तरीही सकस आहार कोणत्याच शाळेच्या उपहारगृहात उपलब्ध नाही.मे महिन्यात शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शाळांच्या उपहारगृहात होते की नाही, हे तपासून पाहण्यासाठी लोकमत प्रतिनिधींनी काही शाळांना भेटी दिल्या. पण, यावेळी पदरी निराशाच पडली. शाळेच्या उपहारगृहांमध्ये शासन निर्णयानुसार बंदी घातलेल्या पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स यासारख्या अति तेलकट, मीठ अथवा गोड असणाऱ्या पदार्थांची रेलचेल होती. मधल्या सुटीत उपहारगृहातील ‘अनहेल्दी’ पदार्थांवरच विद्यार्थी ताव मारत असल्याचे दिसून आले.काही शाळांमध्ये जंकफूड बंदी असली तरीही, चॉकलेट्स, गोळ््या, वडापाव, कोल्डडिंक्स हे खुलेआमपणे विकले जातात. या पदार्थांच्या विक्रीमध्ये काहीच गैर असल्याचे समजले जात नाही. शासन निर्णयामध्ये कोणते पदार्थ नको याची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने कोणते पदार्थ उपहारगृहात असावेत, याचीही यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी कोणताच पदार्थ शाळांच्या उपहारगृहात उपलब्ध नसतो. याविषयी विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची जनजागृती केल्याचे दिसून येत नाही.
विद्यार्थ्यांसाठी उपहारगृहात ‘स्पेशल अनहेल्दी मेन्यू’
By admin | Updated: June 26, 2017 02:43 IST