CM Devendra Fadnavis: दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात केलेल्या गुंतवणूकीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावोसमधल्या गुंतवणूकीवरुन सरकारवर टीका केली होती. या गुंतवणूकी फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा एवढीच अपेक्षा असल्याचे म्हटलं. यावरुनच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटील चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहतात आणि चुकीच्या गोष्टी सांगतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार रोहित पवार आणि वरुन सरदेसाई यांनाही टोला लगावला.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होता. यावेळी राज्यात आलेल्या परकीय गुंतवणूकीबाबतही मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलं. दावोस दौऱ्यावरुन बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख केला. तसेच रोहित पवार आणि वरुन सरदेसाई यांचा तरुण असा उल्लेख करत चिमटा काढला.
"जयंतराव तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात. तुम्ही अजित पवारांचे आणि माझंही ऐकत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. जयंत पाटील याच्यासारख्या नेत्याने राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करु नये. रोहित पवार यांनी केली तरी चालू शकते कारण ते तुलनेने तरुण आहेत. पण ते काय अनभिज्ञ आहेत असं नाही. त्यामुळे तरुण माणसाने केली, वरुन सरदेसाईंनी शंका उपस्थित केली तर चालू शकतं," असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात पहिल्या ९ महिन्यात १ लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दावोस दौऱ्यात १५ लाख ७० हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आली. यात उद्योग विभागानं ११ लाख ७१ हजार कोटी, एमएमआरडीएचे ३ लाख ४४ कोटी, सिडकोचे ५५ हजार दोनशे कोटी रुपयांचे करार झाले. ही गुंतवणूक गुजरातपेक्षा तीनपट जास्त असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.