'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

By Ravalnath.patil | Published: October 13, 2020 04:12 PM2020-10-13T16:12:37+5:302020-10-13T16:22:23+5:30

Kangana Ranaut : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे.

'Sonia Sena is behaving worse than Babur Sena', Kangana Ranaut criticizes Thackeray government | 'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

googlenewsNext
ठळक मुद्देतुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का? राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवालमाझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या पत्रातून राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत पत्रानेच उत्तर दिले आहे.

दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे. याबाबत कंगनाने ट्विट केले आहे. राज्यपालांकडून गुंडा सरकारला प्रश्न विचारला आहे, याबद्दल चांगले वाटले. गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट उघडले. मात्र, राजनीतिकदृष्ट्या मंदिरं बंद ठेवली. बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देत आहे, असे कंगना राणौतने ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून कंगना राणौतने याआधी मुंबई पोलिस आणि राज्य सरकारवरही बोचरी टीका केली होती. कंगना राणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत शिवसेनेशीही पंगा घेतला आहे. याशिवाय, कंगना राणौत मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यामुळे एका नव्या वादास तोंड फुटले होते. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे सरकारवर टीका केल्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का? राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यामध्ये लॉकडाऊन शब्द केराच्या टोपलीत टाकायचा आहे असे तुम्ही म्हटले होते. मात्र तरीही अद्याप राज्यातील प्रार्थनास्थळे उघडलेली नाहीत. एका बाजूला बार, हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र प्रार्थनास्थळे बंदच आहेत. देव अजूनही लॉकडाऊनमध्येच आहेत. अनेक शिष्टमंडळांनी, राजकीय नेत्यांनी, सामाजिक संघटनांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळं सुरू करण्याची मागणी केली आहे, असे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे. याचबरोबर, राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. 'तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अयोध्येला गेला होतात. तुम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला भेट दिली. तिथे पूजाही केली. मग आता मंदिर सुरू करू नये यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?, असा खोचक सवाल कोश्यारींनी उपस्थित केला आहे.

माझ्या हिंदुत्वाला प्रमाणपत्राची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री
राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रानेच उत्तर दिले आहे. 'आपण पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, 'मी अचानक धर्मनिरपेक्ष झालो का? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा धर्मनिरपेक्ष आहे, तो आपल्याला मान्य नाही का?,' असा सवाल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विचारला आहे.
 

Web Title: 'Sonia Sena is behaving worse than Babur Sena', Kangana Ranaut criticizes Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.