...तर दोन्ही गटाचे काही आमदार अपात्र ठरवले जाणार; निकालाआधी कायदा अभ्यासकांनी वर्तवला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 14:49 IST2024-01-10T14:06:06+5:302024-01-10T14:49:26+5:30
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल जाहीर करत नक्की कोणत्या गटाच्या आमदारांना अपात्र करणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

...तर दोन्ही गटाचे काही आमदार अपात्र ठरवले जाणार; निकालाआधी कायदा अभ्यासकांनी वर्तवला अंदाज
Shivsena Disqualification Case ( Marathi News ) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निकाल जाहीर करणार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटांनी परस्परांविरोधात अपात्रतेसाठी विविध याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे आज निकाल जाहीर करत राहुल नार्वेकर नक्की कोणत्या गटाच्या आमदारांना अपात्र करणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. निकालापूर्वी विविध अंदाज व्यक्त केले जात असताना कायद्याच्या अभ्यासकांनीही काही शक्यता वर्तवल्या आहेत.
आमदार अपात्रतेबाबत दोन्ही गटांकडून एकूण ३४ याचिका दाखल करण्यात आल्या असून विधानसभा अध्यक्षांनी या याचिकांची सहा टप्प्यांमध्ये विभागणी केली आहे. याबाबत दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आजच्या निकालात विधानसभा अध्यक्ष यातील काही याचिका स्वीकारतील आणि काही याचिका फेटाळून लावण्याची शक्यता आहे. असं झाल्यास दोन्ही गटाचे काही आमदार अपात्र होणार आहेत.
राज्य विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितलं आहे की, "विधानसभा अध्यक्ष शिवसेनेच्या दोन्ही गटांतील केवळ काही आमदारांनाच अपात्र करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अपात्रतेच्या एकूण ३४ याचिका आहेत. त्यामुळे अपात्रतेबद्दल निर्णय घेताना अध्यक्षांनी अनेक नियमांची चाळण लावलेली असणार. काही प्रकरणांमध्ये आमदारांना अपात्र ठरण्याची स्थिती असेल, मात्र विरोधी गटाने याबाबतचे पाऊल उचलताना नेमकी प्रक्रिया पार पाडलेली नसावी. तर काही प्रकरणांमध्ये प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडलेली असेल, मात्र पक्षात अशा निर्णयाची ऑथोरिटी असणारी व्यक्ती तिथं नसावी. त्यामुळे काही याचिकांच्या आधारे दोन्ही पक्षांतील मोजक्या आमदारांना अपात्र केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच कोणालाच अपात्र केलं जाणार नाही, असंही होऊ शकतं," असं कळसे यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबतचे वृत्त'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
दरम्यान, ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांनीही अशीच शक्यता वर्तवत काही याचिका स्वीकारल्या जातील आणि काही याचिका फेटाळल्या जाऊ शकतात, असं म्हटलं आहे.
किती पानांचा निकाल?
विधानसभा अध्यक्ष आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सायंकाळी चार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत. ५०० पानांच्या निकालपत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. हा साधारण ५-१० पानांचा सारांश निकाल असेल. त्यानंतर निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना दिली जाईल.