नागपूर हिंसाचार : "काही घरे अन् दुकानांना ठरवून लक्ष्य केले; ट्रॉली भरून दगड मिळाले, शस्त्रही केली जप्त"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:52 IST2025-03-19T09:50:57+5:302025-03-19T09:52:08+5:30
नागपूर शहरातील हिंसाचारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन; सर्वांना संयम राखण्याचे आवाहन...

नागपूर हिंसाचार : "काही घरे अन् दुकानांना ठरवून लक्ष्य केले; ट्रॉली भरून दगड मिळाले, शस्त्रही केली जप्त"
मुंबई : नागपूर शहरात सोमवारी निर्माण झालेल्या हिंसाचारात ठरवून काही घरे व दुकानांना लक्ष्य करण्यात आले. ट्रॉली भरून दगड मिळाले असून, शस्त्रही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत निवेदन करताना दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, सोमवारी सकाळी ११:३० वाजता महाल परिसरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेब कबर हटाओ म्हणत आंदोलन केले. गवताची प्रतीकात्मक कबरही जाळली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. संध्याकाळी अफवा पसरविली गेली की जी प्रतीकात्मक कबर जाळली त्यावर धार्मिक मजकूर होता. नमाज आटोपल्यानंतर जमाव जमला व घोषणा दिल्या. हंसापुरी भागात दोनशे ते तीनशेंचा जमाव दगडफेक करू लागले. १२ दुचाकींचे नुकसान झाले. संध्याकाळी साडेसातला दुसरी घटना घडली. एक क्रेन, जेसीबी जाळले. काहींनी जाणीवपूर्वक हल्ला केला.
छावामुळे भावना प्रज्ज्वलित
छावा या चित्रपटाने खरा इतिहास समोर आणला, पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावना प्रज्ज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येतो आहे. असे असले तरी सर्वांनी संयम राखला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाजारपेठांत शुकशुकाट, रस्तोरस्ती बॅरिकेड्स
मध्य नागपुरातील महाल आणि सभोवतालच्या परिसरात सोमवारी रात्री झालेल्या तणावानंतर पोलिस प्रशासनाने सुरक्षा यंत्रणा अतिशय कडक केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पोलिसांनी महाल परिसरासह रेशीमबाग, गांधीबाग, इंदोरा या भागांतही मुख्य रस्त्यावर बॅरिकेडिंग करून वाहतूक थांबविली होती. महाल, गांधीबाग, इतवारी, इंदोरा, सीए रोड, हंसापुरी, मोमिनपुरा या भागांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी घटनेनंतर जमावबंदी व संचारबंदी लागू केल्याने मंगळवारी रस्त्यावरची वर्दळच थांबली होती.
चार उपायुक्त जखमी
पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार झाल्याने ते जखमी झाले. उपायुक्त अर्चित चांडक यांनाही दुखापत झाली, उपायुक्त शशिकांत सावंत यांचा पाय फ्रॅक्चर झाला. याशिवाय झोन दोनचे उपायुक्त राहुल मदने यांच्या तोंडावरही दगडाचा मार बसला.
‘गणेशपेठ’चे १८ जखमी
महाल परिसरात पोलिसांच्या दिशेने दगडफेक करीत धक्काबुक्की केल्याने अनेक जण जखमी झाले. या सर्वांवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार झाले.
जखमींमध्ये एकट्या गणेशपेठ पोलिस ठाण्यामधील १८ पोलिसांचा समावेश होता. तर १९ नागरिकही जखमी झाले. यात १४ वर्षांच्या मुलासह ७२ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश आहे.
शाळा, महाविद्यालये बंद
तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदी लावून कर्फ्यू लावल्याने सकाळी पालकांच्या मोबाइलवर शाळेतून मॅसेज धडकले. मध्य नागपुरातील सर्वच शाळा, कॉलेज, तर दक्षिण, उत्तर नागपुरातील मोठ्या प्रमाणात शाळा बंद ठेवण्यात आल्या.
तणावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आपली बस सेवा, सीताबर्डी रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील वस्त्यांमध्ये बंद ठेवण्यात आली होती.