शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा, बाळासाहेब थोरातांची विधानसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:53 IST2023-07-21T16:52:44+5:302023-07-21T16:53:54+5:30
Maharashtra Monsoon Assembly Session 2023 : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाईट लँडिंगची चाचणी झाली मात्र त्यानंतर ही सुविधा ठप्प आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

शिर्डी विमानतळाच्या समस्या तातडीने सोडवा, बाळासाहेब थोरातांची विधानसभेत मागणी
मुंबई : साई भक्तांना प्रवास सोयीचा व्हावा म्हणून शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असूनही शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिर्डी विमानतळ अनेक संकटांचा सामना करत आहे. नाईट लँडिंगची चाचणी यशस्वी होऊन चार महिने उलटले तरीही ही सुविधा सुरू झालेली नाही याचं नेमकं कारण काय? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा सभागृहात सरकारला घेरले.
काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये दररोज 14 विमाने येत होती, व्हीजीबिलिटी कमी असल्यामुळे सकाळच्या सत्रात विमानांचे आगमन किंवा प्रस्थान होऊ शकत नाही. आघाडी सरकारच्या काळात विमानतळाच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद आम्ही केली होती मात्र त्याचाही विनियोग आपण योग्यरीत्या करू शकलेला नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाईट लँडिंगची चाचणी झाली मात्र त्यानंतर ही सुविधा ठप्प आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
विमानतळाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळावा ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत, त्याबाबत शासनाने स्पष्ट धोरण स्वीकारावे. प्रवाशांसाठी विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग अपुरी पडते, नवीन कामाला तातडीने गती द्यावी, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शासनाच्या अनास्थेमुळे फ्लाईटची संख्या रोडावलेली आहे. विमानतळ विकास कंपनीचे शिर्डी विमानतळाच्या सोयी सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. आपण स्पष्ट शब्दात नाईट लँडिंग सुविधा कधी सुरू होणार? शिर्डी विमानतळाचा विकास कधी होणार? तिथल्या सोयी सुविधांमध्ये कधी वाढ होणार? याबद्दल स्पष्ट निवेदन करावे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नाईट लँडिंग संदर्भात काही अटींमुळे अडचणी आल्या होत्या, मात्र हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी तातडीने बोलून हा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन. यासोबत टर्मिनल बिल्डिंग मुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे हे मान्य करत, सध्या आम्ही तिथे फॅब्रिकेटिंग एसी एरिया तयार केला आहे. त्यामध्ये वाढ करून प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.