‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:05 IST2025-12-18T13:04:20+5:302025-12-18T13:05:17+5:30
Solapur Municipal Election 2026: राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्याबरोबरच राज्यातील या प्रमुख शहरांमधील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
राज्यात सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्याबरोबरच राज्यातील या प्रमुख शहरांमधील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालेली दिसत आहे. त्यातच भाजपाच्या एका कार्यकर्त्याने उमेदवारी मिळवण्यासाठी चक्क धमकी दिली आहे. आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून, यावेळी उमेदवारी मिळाली नाही तर माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास त्याला पक्ष जबाबदार असेल, अशी धमकीच या कार्यकर्त्याने पक्षाला दिली आहे.
अनंत धुम्मा असं या भाजपाच्या कार्यकर्त्याचं नाव असून, त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून भाजपाचं काम करत आहे. पक्षाच्या स्थापनेपासून मी पक्षाचं काम करत आहे. त्यामुळे यावेळी मला १०० टक्के न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मात्र यावेळी उमेदवारी मिळाली नाही. माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत चुकीचा वर्तन केलं गेलं तर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्याच मी जबाबदार राहणार नाही, अशी धमकीही अनंत धुम्मा यांनी दिली आहे.
दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेतील निवडणुकीसाठी भाजपाकडे इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्या आहेत. पालिकेतील १०२ जागांसाठी पक्षाकडे सुमारे १२०० हून अधिक इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच यामध्ये पक्षाने नव्याने आलेल्या अनेकांचा समावेश असल्याने निष्ठावंत असलेल्या अनेक इच्छुकांना धक्का बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.