अरुण बारसकर
लोकमत न्यूज नेटवर्क, सोलापूर: ज्वारी पेरणीत यंदाही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल असून, राज्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच ५० टक्क्यांपर्यंत पेरा झाला आहे. ज्वारी पेरणीत सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा असला तरी गहू व हरभऱ्याने मराठवाड्यातील क्षेत्र अधिक व्यापले आहे.
राज्यात ज्वारीचे सरासरी १४ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्र असले तरी प्रत्यक्षात १५ लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली आहे. त्यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपर्यंत तर अहिल्यानगरसह पश्चिम महाराष्ट्रात ७ लाख ४० हजार हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे.
गहू पेरणीत छ. संभाजीनगर नंतर नागपूर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गव्हाची सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली, तर नागपूर जिल्ह्यात ८९ हजार हेक्टर, बुलढाण्यात ६६ हजार, नाशिक जिल्ह्यात ६१ हजार, जालना जिल्ह्यात ६० हजार, पुणे व जळगावमध्ये प्रत्येकी ५५ हजार, सोलापूर जिल्ह्यात ५० हजार हेक्टर, बीड जिल्ह्यात ४५ हजार तर सातारा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला.
कुठे किती पेरणी?
जिल्हा ज्वारी गहू (हेक्टरमध्ये)
- सोलापूर २,४३,००० ५०,१६८
- धाराशिव १,७०,२८९ २६,१४२
- बीड १,५७,५०३ ४४,५६४
- अ.नगर १,४९,२९३ १,३३,५८२
- सातारा १,३०,१०१ ४०,२२६
- सांगली १,१९,१९३ १९,२२३
- परभणी ९३,७४४ २७,८८९
- पुणे ८७,८१२ ४२,१३८
- जालना ८४,८९० ५९,४९९
मराठवाड्यातही ज्वारीचा पेरा चांगला असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ६ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.