सोलापूरमधील मंगळवेढा येथे एका महिलेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. मात्र ज्या महिलेला मृत मानलं जात होतं ती मात्र प्रत्यक्षात जिवंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामधून या महिलेने चुलत दिरासोबतचे अनैतिक संबंध बिनबोभाटपणे सुरू राहावेत यासाठी एका वेडसर महिलेला ठार मारून तिचा मृतदेह जाळून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी सदर आरोपी महिला किरण सावंत आणि तिचा चुलत दीर निशांत सावंत यांना अटक केली आहे. त्यानंतर आता आरोपी महिलेच्या पतीची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.
या प्रकरणातील आरोपी महिला किरण सावंत हिचा पती नागेश सावंत याला पत्नीच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती. मात्र सत्य समोर आल्यावर त्याला सोडून देण्यात आले होते. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे त्याला जबर धक्का बसला आहे. तो म्हणाला की, या घटनेमुळे आमचं संपूर्ण कुटुंब भीतीच्या छायेखाली आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला दोन वर्षांची मुलगी आहे. मात्र माझ्या पत्नीने तिचाही विचार केला नाही.
दरम्यान, ज्या निशांत सावंत याने कडब्याला आग लावली होती. त्यानेच आम्हाला येऊन आग लागल्याचे सांगितले. तसेच आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला एक मृतदेह सापडला. तो मृतदेह माझी पत्नी किरण हिचा असावा असं आम्हाला सुरुवातीला वाटलं, असेही त्याने सांगितले.