तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह जळगाव, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतशिवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक ठिकाणी शेतरस्ते खुले झाले. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही पूरस्थिती कायम आहे. शिवारात सलग एक ते दोन आठवडे पाणी साचलेले राहिल्याने सोयाबीनला कोंब फुटले आहेत, तर कपाशीच्या अक्षरश: वाती झालेल्या आहेत. मका, बाजरी, केळीसह इतर फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. काही भागांत अपरिपक्व पिके काढून मिळेल तेवढे उत्पन्न वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.
हिंगोली, परभणी, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांवर अक्षरश: नांगर फिरविला आहे. हजारो दुभती जनावरे पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा आधारही या संकटाने हिरावला आहे. धाराशिव जिल्ह्यात तब्बल सव्वादोनशेहून अधिक पूलही मुसळधार पाऊस आणि पुरामुळे क्षतिग्रस्त झाले. तर ७०० किमीहून अधिक लांबीचे रस्ते क्षतिग्रस्त झाले आहेत.
पुराने अडवला मृतदेह; घेतला तराफ्याचा आधारगंगाखेड (जि. परभणी): रविवारी खळी येथे एक माता आपल्या लेकरांना भेटण्यासाठी चक्क पुरातून पोहोत पलीकडे पोहोचल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशीही खळी येथील पुलावर पाणी आल्याने ४५ वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहासह नातेवाइकांना तराफ्याचा आधार घेत घर गाठावे लागले. यावेळी खळीकरांनी मदत करत, भावनिक प्रसंगात परिवाराला आधार दिला. या क्षणाने उपस्थित सर्वांना भावुक केले.
मराठवाड्यातील स्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांतून होणाऱ्या विसर्गाचा आढावा घेतला. सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश दिले.जायकवाडी धरणातून एक लाख ८८ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. सुदैवाने पाऊस बंद झाल्याने आता विसर्ग वाढविण्याची गरज नाही. आज रात्रीपर्यंत हे पाणी नांदेडपर्यंत पोहोचेल, अशी माहिती यावेळी दिली.
तीन दिवसांच्या पावसात चौघांचे बळीनाशिक : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतल्याने पुराचा जोर ओसरला. मात्र, दोन दिवसांच्या पावसाने जिल्ह्यात घरांची पडझड होऊन चार बळी घेतले. बागलाण तालुक्यात टेंभे या गावातील कस्तुराबाई अहिरे, देवचंद सोनवणे, निर्मला सोनवणे यांचा तर सोमवारी (दि. २९) नाशिक शहरात दिलीप ठाकरे यांचा मृत्यू झाला.बीड : गेवराई तालुक्यात गोदापात्रातील पाणीपातळी वाढली. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेत ३२ गावांतील २३०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. सोमवारी पाणी कमी होताच १५०० लोक स्वगृही पोहोचले.
जगण्यासाठी काहीच शिल्लक नाही; दोष कुणाला देता?करमाळा (जि. सोलापूर) : डोळ्यादेखत गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. एवढंच काय तर घरात पाणी शिरल्याने घरातील भांडीकुंडी, कपडे, अंथरूण, पांघरूण, धान्य, मुलांचे दप्तर पुराच्या भिजून त्याचा चिखल झाला आहे. आता घरात फक्त चिखल व गाळ साठलेला आहे. दहा एकर शेतातील ऊस, बाजरी, उडीदाची उभी पिके जमिनीतील मातीसह खरडून वाहून गेली. जगण्यासाठी आता काहीच शिल्लक नाही. दोष कुणाला देता, अशी भावनिक प्रतिक्रिया बोरगाव येथील सुखदेव महादेव भोई या ८० वर्षांच्या वृद्धाने आपत्ती व्यवस्थापन कक्षात आश्रयाला आल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मेघराजांचा मुक्काम बदलला, कोकणातून मराठवाड्यात ठिय्या सप्टेंबर महिन्यात साधारणपणे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. मात्र यंदाचा पावसाला त्याला अपवाद ठरला. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झोडपून काढले. सप्टेबरमध्ये त्याचा अधिकच जोर वाढला आहे.
कमी काळात जास्त पाऊसमराठवाड्यात ६ आठवडे पाऊस अत्यंत कमी, तर ५ आठवडे अतिवृष्टी राहिली. येथे कमी काळात अधिक पाऊस झाला.
अतिवृष्टी किती आठवडे? विदर्भ मराठवाड्यात प्रत्येकी पाच-पाच आठवडे अतिप्रमाणात पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात चार तर, कोकणात केवळ दोन आठवडे अतिपावसाचे प्रमाण राहिले. २०२४ च्या पावसाळ्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला होता.
कोकणात होतो धो-धो दरवर्षी कोकण विभागात धो-धो बरसणारा पाऊस यंदा मराठवाड्यात मुक्कामी थांबला. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात यंदा कमी कालावधीत अधिक पाऊस झाला.
कर्मचाऱ्यांकडून ५० कोटींची मदतराज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या साडेतीन लाख कर्मचाऱ्यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला दिले आहे. ही रक्कम ५० कोटीपर्यंत आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे निर्देश चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण व सरचिटणीस बाबाराम कदम यांनी दिले.
सिद्धिविनायक ट्रस्टची १० कोटींची मदतमुंबई : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट पुढे सरसावले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ट्रस्टचे खजिनदार पवन त्रिपाठी म्हणाले की, संकटातून राज्याला लवकर बाहेर काढण्यासाठी ट्रस्टने १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापुरातून पाठविले २७ टेम्पोकोल्हापूर : महापुराच्या संकटात अडकलेल्या मराठवाड्याला मदत करण्यासाठी धान्यासह किराणा सामान, प्रथमोचार साहित्य, सॅनिटरी पॅडस, चप्पल, स्लिपर्स, पाणी बॉटल्स, कपड्यांपासून ते ब्लँकेट्स, चटईपर्यंत कोल्हापुरातील प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला. यातून तब्बल २७ टेम्पो भरून गोळा झालेली मदत सोमवारी खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाडा व सोलापूर जिल्ह्याकडे पाठवण्यात आली. विविध जिल्ह्यात टेम्पो पाठवण्यात आले.
‘बुलढाणा अर्बन’ने दिला मदतीचा हात बुलढाणा : पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने पाच लाख रुपयांचा मदतनिधीचा धनादेश जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या स्वाधीन करण्यात आला. बुलढाणा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देखील १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला.
Web Summary : Heavy rains devastated Marathwada, Jalgaon, Solapur, and Ahilyanagar, submerging farms and ruining crops. Livestock was lost, and infrastructure damaged. Relief efforts are underway with government aid and public donations pouring in to support affected communities.
Web Summary : भारी बारिश ने मराठवाड़ा, जलगांव, सोलापुर और अहिल्यानगर में तबाही मचाई, खेत डूब गए और फसलें बर्बाद हो गईं। पशुधन का नुकसान हुआ, और बुनियादी ढांचे को नुकसान पहुंचा। प्रभावित समुदायों का समर्थन करने के लिए सरकारी सहायता और सार्वजनिक दान के साथ राहत प्रयास जारी हैं।