...त्यामुळे आम्ही गॅसवर असतो; मी लोकांच्या हिताचे काम करणार; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 12:41 IST2023-11-13T12:08:17+5:302023-11-13T12:41:52+5:30
काही लोकांना कोरोना हवा होता. परंतु कोरोना संदर्भात बैठक घेऊन बाऊ न करता ठोस कारवाई करत आम्ही राज्याला कोरोना मुक्त केले. - शिंदेंचा ठाकरेंना टोला

...त्यामुळे आम्ही गॅसवर असतो; मी लोकांच्या हिताचे काम करणार; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला
गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार जाणार, आमदार आपात्र होणार अशी टीका त्यांचे विरोधक करत आहेत. यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जे जे काही करेन ते मी लोकांच्या हिताचे काम करेन. सगळे सण आगदी आनंदात साजरे झाले पाहिजेत आणि आपले सण आपण जोपासले पाहिजेत. समीर चौघुलेंचा मी फॅन आहे, असे शिंदे म्हणाले. ते ठाण्यातील एका दिवाळीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुले आणि आई कुठे काय करतेमधील अभिनेत्री मधुराणी गोखले हे आले होते. यावेळी स्टेजवरील हास्य विनोदामध्ये शिंदे यांना तुम्ही आमच्या मनातील मुख्यमंत्री आहात असे म्हटले गेले. यावर शिंदेंनी चपखलपणे उत्तर दिले.
राज्य कारभार करताना कधी कोण काय बोलेल त्यामुळे आम्ही गॅसवर असतो. सगळ्यांना माहीत आहे जसे आपले सरकार आले आणि कोरोना पळून गेला, असे शिंदे म्हणाले. काही लोकांना कोरोना हवा होता. परंतु कोरोना संदर्भात बैठक घेऊन बाऊ न करता ठोस कारवाई करत आम्ही राज्याला कोरोना मुक्त केले. मी कधी बैठक घेतली नाही, पण बैठक न घेता जे काय करायचे होते ते मी करत होतो, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
प्रदूषण कमी करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे यात आम्हाला यश येईल. मी किती काय ठरवले तरी जनता जनार्दनाच्या हातात असते, मुख्यमंत्री कोणाला करायचे ते, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.