रत्नागिरी : वापरा आणि फेकून द्या पद्धतीचे राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बाजूला करून मनसेला जवळ केले असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. पण मग आता त्यांच्या महाविकास आघाडीला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची का असा खोचक टोला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.जयगड बंदराच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर परखड मते मांडली. यावेळी त्यांनी उद्धवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर टीका करत महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे नेहमीच सोयीचे राजकारण करतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या मदतीने खासदार निवडून आणल्यानंतर आता त्यांना महाविकास आघाडीऐवजी मनसेसोबत जायचे असल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हीच त्यांची ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी पद्धत आहे. अलीकडेच मातोश्रीवर त्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी भेट नाकारली. काँग्रेस नेते बंटी पाटील यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते करायचा प्रस्तावही उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावला असून, त्यांना अनिल परब यांना हे पद द्यायचे आहे, असेही राणे म्हणाले. मनसेच्या जवळ गेल्यामुळे उद्धवसेनेला काँग्रेस दूर करत असेल तर तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कोकणच्या विकासावर बोलताना राणे यांनी सांगितले की, कोकणामध्ये रोजगार आणि नोकऱ्या आल्या पाहिजेत. तरुण-तरुणींनी मुंबई, पुणे, येथे न जाता आपल्या गावीच राहून काम केले पाहिजे, म्हणूनच रोजगार देणाऱ्या प्रकल्पांना कोकणवासीयांनी समर्थन दिले पाहिजे. मागील दहा वर्षांतील उद्धवसेनेच्या घाणेरड्या राजकारणामुळेच कोकण मागे पडले आहे. मात्र मातोश्रीवरून सुरू असलेले नकारात्मक राजकारण जनतेने नाकारले असून, जनतेने रोजगार आणि विकासासाठी महायुतीला निवडून दिले आहे. त्यामुळे रोजगार वाढवणारे प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊन पुढे नेले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
तर महाविकास आघाडीला ‘श्रद्धांजली’ द्यायची का?, मंत्री नितेश राणे यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:02 IST