...तर आता ‘लाडक्या बहिणी’ला निधी मिळणार नाही! अर्जांची छाननी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:13 IST2025-01-03T07:12:53+5:302025-01-03T07:13:41+5:30
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

...तर आता ‘लाडक्या बहिणी’ला निधी मिळणार नाही! अर्जांची छाननी सुरू
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तसेच कुटुंबात चारचाकी गाडी असेल तर अशा महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी प्राप्तीकर विभागाकडून माहिती मागवणार आहोत. पॅन कार्डशीही उत्पन्नाची पडताळणी केली जाईल, असे अदिती तटकरे यांनी सांगितले, तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडूनही माहिती मागवली जाणार आहे. इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थी महिलांना वरच्या फरकाच्या रकमेचा लाभ दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख असेल तरच लाभ
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, अशी अट ही योजना घोषित करतानाच सरकारने टाकली होती.
- मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्जांची पडताळणी न करता सरसकट अर्ज केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला आहे.
- या योजनेत लाभार्थी महिलांची संख्या अडीच कोटीच्या घरात आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार येत असल्याने अपात्र महिलांना वगळण्यासाठी सरकारने आता पावले उचलली आहेत.