"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 15:08 IST2025-12-21T15:07:05+5:302025-12-21T15:08:46+5:30
Maharashtra Nagar Palika Election Result: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा धुरळा उडवला आहे.

"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
Local Body Election Results 2025: २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला पुन्हा लोळवले. २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत वचर्स्व सिद्ध केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा अपयश आले आहे. यात ठाकरेंच्या शिवसेनेची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यावरूनच भाजपने उद्धव ठाकरेंवर पहिला हल्ला चढवला.
भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरेंचा उल्लेख न करता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाण डागला.
शेलार म्हणाले, पूर्णपणे सुपडा साफ'
आशिष शेलार यांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की, "शुन्य अधिक शुन्य बेरीज शुन्यच! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे, असे आवाहन देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना केले होते."
"हे आदेश शिरसावंद्य मानून भाजपा कार्यकर्त्यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीत विरोधी पक्षांचा पुर्णपणे सुपडा साफ केला", असा हल्ला शेलारांनी महाविकास आघाडीवर चढवला.
"सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनेही चांगले यश मिळाले. त्यांचेही अभिनंदन !! हिंदुत्व सोडून बाकी काँग्रेसच्या बुडत्या जहाजात जे गेले ते जवळपास काँग्रेससह बुडाल्यात जमा आहेत ! अजून ही मोठे पराभव बाकीच आहेत !! म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य बेरीज शून्यच", अशा शब्दात आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपचे, दुसऱ्या क्रमांकावर शिंदे
राज्यात २८८ नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक झाली. यात सर्वाधिक ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे.
भाजपने १२० ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा ५४ ठिकाणी विजय झाला असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० उमेदवार नगराध्यक्ष बनले आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने ३४ जागा जिंकल्या आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ७ ठिकाणी विजय झाला. ठाकरेंच्या शिवसेनेला ८ जागा मिळाल्या असून, अपक्ष २५ ठिकाणी विजयी झाले आहेत.