...म्हणून त्याने पाठवला शिंदेंना धमकीचा मेल; दोन मित्रांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 06:42 IST2025-02-23T06:42:08+5:302025-02-23T06:42:15+5:30
बुलढाण्याहून अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये याच कारणावरून वाद होत, अशी माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली आहे.

...म्हणून त्याने पाठवला शिंदेंना धमकीचा मेल; दोन मित्रांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हयात नसलेल्या प्रेयसीवरून छळणाऱ्या मित्राला धडा शिकवण्यासाठी आरोपीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाहन बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. बुलढाण्याहून अटक केलेल्या दोन आरोपींमध्ये याच कारणावरून वाद होत, अशी माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा ई-मेल काही पोलिस ठाण्यांना आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ११ने बुलढाण्याहून मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे यांना ताब्यात घेऊन गोरेगाव पोलिसांच्या हवाली केले. न्यायालयाने त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोन्ही आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, अभयची प्रेयसी हयात नाही. त्याचे निमित्त करून मंगेश सतत त्याला मानसिक त्रास देत होता. मंगेशला अद्दल घडवावी, असे अभयच्या मनात होते. त्यामुळे त्याने मंगेशच्या मोबाईलवरून धमकीचा ई-मेल पाठवला. मंगेशला पोलिस अटक करतील, त्याची बदनामी होईल, असा विचार अभयने केला होता. मंगेशने आपला मोबाईल अभयच्या घरी चार्ज करण्यासाठी ठेवला होता. ही संधी साधत अभयने धमकीचा ई-मेल पाठविल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याप्रकरणी अन्य बाजूनींही तपास सुरू आहे.