SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:39 IST2025-06-20T12:37:29+5:302025-06-20T12:39:07+5:30
Swiss Bank: वर्ष २०२४ मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढल्याचा अहवाल समोर आला.

SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
नवी दिल्ली/झुरिक : वर्ष २०२४ मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढून ३.५ अब्ज स्वीस फ्रँक (३७,६०० कोटी रुपये) झाला. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. स्थानिक शाखा आणि अन्य वित्तीय संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या पैशांत मोठी वाढ झाल्यामुळे हा आकडा वाढला असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
स्विस नॅशनल बँकेने (एसएनबी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये स्विस बँकांत भारतीय ग्राहक खात्यांतील पैसा मात्र केवळ ११ टक्के वाढून ३४६ दशलक्ष स्विस फ्रँक (सुमारे ३,६७५ कोटी रुपये) झाली. एकूण ठेवींच्या तुलनेत हा आकडा एक दशांश एवढाच आहे. आदल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये स्विस बँकांतील भारतीयांचा पैसा ७० टक्के घसरून केवळ १.०४ अब्ज स्विस फ्रँक एवढाच राहिला होता. हा ४ वर्षांचा नीचांक होता.
२०२१ मध्ये भारतीयांचे ३.८३ अब्ज स्विस फ्रँक स्वीस बँकांत होते. हा १४ वर्षांचा उच्चांक ठरला होता. त्यानंतरचा सर्वाधिक पैसा २०२४ मध्ये भारतातून स्विस बँकांत गेला आहे.
सूत्रांनी सांगितले की, स्विस नॅशनल बँकेने जारी केलेले हे अधिकृत आकडे असून ते कथित काळ्या पैशाचे प्रतिनिधित्व करीत नाहीत, तसेच भारतीयांनी, अनिवासी भारतीयांनी वा अन्य व्यक्तींनी स्विस बँकांत तिसऱ्या देशांतील संस्थांच्या नावे ठेवलेल्या पैशांचाही संकेत त्यातून होत नाही.
अहवालात अजून काय?
‘एसएनबी’ने २०२३ च्या अखेरीस स्विस बँकांची एकूण देयता असलेली रक्कम ३५४.५५ कोटी स्विस फ्रँक इतकी होती. यात ग्राहक ठेवींद्वारे ठेवलेले ३४.६ कोटी स्विस फ्रँक, अन्य बँकांच्या माध्यमातून ठेवलेले ३.०२ अब्ज स्विस फ्रँक, ट्रस्टच्या माध्यमातून ठेवलेले ४.१ कोटी स्विस फ्रँक आणि रोखे, समभाग आणि अन्य वित्तीय उत्पादनांच्या स्वरूपात १३.५ कोटी स्विस फ्रँक यांचा समावेश आहे.