स्मार्ट सिटींसाठी स्थानिक नेतृत्व स्मार्ट हवे

By Admin | Updated: June 7, 2015 01:44 IST2015-06-07T01:44:40+5:302015-06-07T01:44:40+5:30

स्मार्ट सिटींसारख्या योजना यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेतृत्वही स्मार्ट हवे, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले.

The smart leadership for smart cities is smart | स्मार्ट सिटींसाठी स्थानिक नेतृत्व स्मार्ट हवे

स्मार्ट सिटींसाठी स्थानिक नेतृत्व स्मार्ट हवे

मुंबई : स्मार्ट सिटींसारख्या योजना यशस्वी करण्यासाठी स्थानिक नेतृत्वही स्मार्ट हवे, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी केले. विज्ञान भारती आयोजित ‘स्मार्ट सिटी - डिलिव्हरी आॅफ सिव्हिक सर्व्हिसेस’ या दोन दिवसीय परिसंवादाचे उद्घाटन करताना ते वेलिंगकर इन्स्टिट्यूट येथे बोलत होते.
ते म्हणाले की, स्मार्ट सिटीसारख्या योजना राबविताना लोकांची मानसिकता आधी बदलली पाहिजे, असे सांगत त्यांनी या योजना लोकसहभागाशिवाय यशस्वी होणार नाहीत याची जाणीव दिली. सर्व काही सरकार करेल, असा विचार करण्याची सामान्य माणसाला सवय लागली आहे, ती बदलावी लागेल, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. स्थानिक व्यवस्थापन सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
पाण्याचा पुनर्वापर, एलईडी दिव्यांसारख्या माध्यमातून ऊर्जेचा स्मार्ट वापर हे कळीचे मुद्दे असतील, पाण्याची उपलब्धता व स्वच्छ पाणी हे यापुढील देशासमोरचे आव्हान असेल, याची जाणीव नायडू यांनी करून दिली. या परिसंवादाचे बीजभाषण करताना डॉ. माधवराव चितळे यांनी भारताच्या इतिहासातून नागरी नियोजनासंदर्भात व सामाजिक जीवनासंदर्भात शिकण्याची गरज प्रतिपादित केली. ते पुढे म्हणाले की, सामाजिक अस्मिता हा स्मार्ट सिटीचा पाया असेल, भारत प्राचीन काळाप्रमाणे पुन्हा एकदा जागतिक नागरी जीवनाच्या केंद्रस्थानी येईल, असे डॉ. चितळे म्हणाले. स्मार्ट सिटी नियोजनात जनसहभाग वाढविण्यास नागरी मंच स्थापन करण्याचे आवाहन डॉ. चितळे यांनी केले. उद्घाटन सत्रात प्रा.सुहास पेडणेकर, उद्योजक व या परिसंवादाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अरुण नंदा, डॉ.एस. रामदुराई, प्रा. उदय साळुंके आणि विज्ञान भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ.विवेकानंद पै उपस्थित होते.

स्मार्ट सिटीजमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर दिला पाहिजे. आज शहरांमधे रोज कामावर जाताना लांबचा प्रवास करावा लागतो, हे चुकीच्या नियोजनाचे फलित आहे. स्मार्ट सिटींचा विचार करताना निसर्ग संवर्धन, संस्कृती यांचा विचार करून भविष्यकालीन नियोजन केले पाहिजे. - वेंकय्या नायडू

Web Title: The smart leadership for smart cities is smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.