विधान परिषदेच्या ५ जागांसाठी सहा अर्ज; अजित पवार गटातून खोडके, तर शिंदेसेनेकडून रघुवंशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:40 IST2025-03-18T09:39:44+5:302025-03-18T09:40:21+5:30
...तर अजित पवार गटाने सोमवारी पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके आणि शिंदेसेनेने नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी जाहीर केली.

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी सहा अर्ज; अजित पवार गटातून खोडके, तर शिंदेसेनेकडून रघुवंशी
मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकूण सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने रविवारी आपले तीन उमेदवार जाहीर केले होते. तर अजित पवार गटाने सोमवारी पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके आणि शिंदेसेनेने नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी जाहीर केली.
पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलेल्यांमध्ये भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे, संजय खोडके आणि चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यातील दौंड येथील उमेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी दुपारी १२ वाजता या सर्व अर्जांची छाननी होणार आहे. म्हात्रे यांनी भरलेल्या अर्जासोबत अनुमोदक आणि सूचक म्हणून एकाही आमदाराची स्वाक्षरी नसल्याने तो अर्ज बाद होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत खोडके यांनी व शिंदेसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रघुवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
विधानसभा निवडणुकीत प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर, आमश्या पाडवी, राजेश विटेकर हे विधान परिषदेचे आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या पाच जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
विधिमंडळात पहिल्यांदाच नवरा-बायकोची जोडी
अजित पवार गटाकडून प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांना विधान परिषदेवर संधी दिल्याने महाराष्ट्राच्या विधिमंडळात पहिल्यांदाच पती-पत्नीची जोडी सदस्य म्हणून एकत्र दिसणार आहे.
संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या अजित पवार गटाकडून अमरावती मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या आहेत. त्यामुळे पती विधानपरिषदेत तर पत्नी विधानसभेत प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.