सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 06:01 IST2025-08-23T06:00:34+5:302025-08-23T06:01:22+5:30
परभणीतील पोलिस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने प्रकरण वादात

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परभणीतील पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिस महासंचालकांना आठ दिवसांत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एसआयटीची घोषणा केली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणी युक्तिवाद करत एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली होती, त्यानुसार खंडपीठाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
सुधीर हिरेमठ असतील एसआयटीचे अध्यक्ष
- या एसआयटीचे अध्यक्ष म्हणून सुधीर हिरेमठ, (विशेष पोलिस महानिरीक्षक, सीआयडी, पुणे), तर सदस्य म्हणून अभिजित धाराशिवकर (पोलिस अधीक्षक, सीआयडी, नागपूर), अनिल गवाणकर (पोलिस उपअधीक्षक, सीआयडी, नांदेड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्याविरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टात पीडितांच्या बाजूने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने खंडपीठाचा आदेश कायम ठेवला होता.
सुरुवातीपासूनच एसआयटी स्थापन व्हावी, अशी आग्रही मागणी वेळोवेळी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर आता एसआयटी स्थापन झाली, त्याबाबत समाधानी आहे. लवकर चौकशी पूर्ण होऊन न्याय मिळावा.
- विजयाबाई सूर्यवंशी, मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई