एकनाथ शिंदेंना धक्का! मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 05:38 IST2025-02-07T05:37:36+5:302025-02-07T05:38:52+5:30
Eknath Shinde News: एसटीची आर्थिक स्थिती नाजूक असताना महामंडळात सुरु असलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी फडणवीस यांनी एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्याची अथवा आमदाराची वर्णी लावण्याचे टाळले आहे.

एकनाथ शिंदेंना धक्का! मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे
मुंबई : एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्यांची वर्णी लावण्याची प्रथा मोडीत काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवली आहे. या निर्णयानुसार एसटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे असतील. फडणवीस यांचा हा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जातो.
एसटीच्या ताफ्यात १,३१० बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. एसटीची आर्थिक स्थिती नाजूक असताना महामंडळात सुरु असलेल्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी फडणवीस यांनी एसटीच्या अध्यक्षपदी राजकीय नेत्याची अथवा आमदाराची वर्णी लावण्याचे टाळले आहे.
महायुती सरकारमध्ये परिवहन खाते शिंदे यांच्या गटाकडे असून प्रताप सरनाईक हे या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे शासकीय महामंडळावरील नेमणुकीवेळी एसटी महामंडळावर शिंदे गटाचा दावा होता. मात्र, फडणवीस यांच्या निर्णयाने हा दावा आता निकाली निघाला आहे.
इतर महामंडळांचे काय?
विविध खात्यांच्या अखत्यारित विविध महामंडळे येतात. या महामंडळाचे अध्यक्षपद देखील राजकीय व्यक्तींऐवजी आता सनदी अधिकाऱ्यांना देण्यात येईल का, याबाबत उत्सुकता आहे.
...हे होते अध्यक्ष
अलीकडच्या काळात म्हणजे आघाडी सरकारच्या काळात जीवन गोरे, सुधाकर परिचारक हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते.
२०१४ ते २०१९ या युती सरकारच्या काळात तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते, २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.