Shivsena Dasara Melava 2021: ...तर मी तेव्हाच राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 19:57 IST2021-10-15T19:56:09+5:302021-10-15T19:57:02+5:30
Shivsena Dasara Melava 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्यात महत्त्वाचं विधान; भाजपचा खरपूस समाचार

Shivsena Dasara Melava 2021: ...तर मी तेव्हाच राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
मुंबई: गेल्या दोन वर्षांत जनतेनं इतकं प्रेम दिलं की मी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं विधान करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला लगावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. षण्मुखानंद सभागृहात संपन्न झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती हल्ला चढवला.
"मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असं कधीच मला वाटू नये. माझ्या जनतेलाही तसं वाटू नये. कारण त्यांना मी त्यांच्या घरातला वाटलो पाहिजे. जे मी पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत होते आता ते मी गेलोच नाही असं म्हणू लागलेत. आता तुम्ही बसा तिकडेच'', अशी जोरदार सुरुवात करत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला.
...तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो
"मला काही मुख्यमंत्री व्हायची हौस नव्हतीच. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही आणि मला वडिलांना दिलेलं वचन पाळायचं होतं, म्हणून माझ्यावर प्रशासनात यायची वेळ आली. पुत्र कर्तव्य म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही जर त्यावेळी शब्द पाळला असता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला असता तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. तुमचाही मुख्यमंत्री नक्कीच पाहायला मिळाला असता. पण नशीब नावाचीही एक गोष्ट असते जी तुमच्या बाजूनं नव्हती", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
स्वत:च्या हिमतीवर आव्हानं द्या; मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले
कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ आणि मी हे आव्हान माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतोय. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर आव्हान देत नाही. तुम्हाला अंगावर यायचं असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या. सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका. आव्हानं द्यायचं आणि मग पोलिसांच्या मागे लपायचं याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात, असं ठाकरे म्हणाले.