छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींच्या साक्षीने होणार युतीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 19:09 IST2019-02-18T19:07:22+5:302019-02-18T19:09:51+5:30
दीर्घकाळाच्या मैत्रीनंतर आलेला दुरावा, अनेक वादविवाद आणि ताणतणावानंतर शिवसेना आणि भाजपामधील युतीची नव्याने घोषणा होण्याची घटिका जवळ आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींच्या साक्षीने होणार युतीची घोषणा
मुंबई - दीर्घकाळाच्या मैत्रीनंतर आलेला दुरावा, अनेक वादविवाद आणि ताणतणावानंतर शिवसेना आणि भाजपामधील युतीची नव्याने घोषणा होण्याची घटिका जवळ आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयुक्त पत्रकार परिषदेमधून युतीची घोषणा करणार आहेत. दरम्यान, युतीच्या घोषणेला भावनिक रंग देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून खास तयारी करण्यात आली आहे.
वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये शिवसेना आणि भाजपा नेतृत्वाची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, संयुक्त पत्रकार परिषदेच्या आयोजनस्थळी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे पुतळे आणि प्रतिमा लावण्यात आल्या असून, आसपासच्या भागाला भगवा रंग देण्यात आला आहे. त्यामुळे भगव्यासाठी, हिंदुत्वासाठी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींच्या साक्षीने शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून होणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आघाडीचं जागावाटप ठरलं असतानाच शिवसेना-भाजपा युतीहोण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. लोकसभेच्या भाजपा 25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवणार असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा पालघरची जागाही शिवसेनेला देण्यास तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यावर शिवसेना आणि भाजपात एकमत झाले असून, सोमवारी भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.