“वाघनखांबाबतच्या शंकांमागे राजकारण, मुद्दामहून...”; शिवेंद्रसिंहराजेंची आदित्य ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 23:02 IST2023-10-01T22:56:42+5:302023-10-01T23:02:25+5:30
Shivendrasinh Raje Vs Aaditya Thackeray: लंडनमधील ती वाघनखं खोटी आहेत, हे सिद्ध करून दाखवावे, असे थेट आव्हान शिवेंद्रसिंह राजे यांनी आदित्य ठाकरेंना दिले.

“वाघनखांबाबतच्या शंकांमागे राजकारण, मुद्दामहून...”; शिवेंद्रसिंहराजेंची आदित्य ठाकरेंवर टीका
Shivendrasinh Raje Vs Aaditya Thackeray: छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक मोहिमांमध्ये वापरलेली वाघनखे महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली होती. मात्र, यावरून राज्यात दावे-प्रतिदावे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवरून भाष्य करताना शंका उपस्थित केली होती. याला आता राजघराणाचे सदस्य आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उत्तर दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारीपाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं राज्यात येणार आहेत. लंडनच्या वस्तुसंग्रहालयात असणारी वाघनखं ही महाराजांनी वापरली होती का? याबाबत सरकारकडे स्पष्टता आहे का, अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली होती. यावर शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिले.
वाघनखं खोटी आहेत, हे सिद्ध करून दाखवा
मीडियाशी बोलताना, वाघनखांबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंकांच्या मागे राजकारण आहे. मुद्दामहून याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आदित्य ठाकरे यांनी लंडनमधील ती वाघनखं खोटी आहेत हे सिद्ध करावे. या भावनिक विषयांवर विरोधकांनी राजकारण करू नये. उलट ज्यावेळी ही वाघनखे मुंबईत येतील, त्यावेळी त्यांचे स्वागत करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
दरम्यान, राज्यातील महायुती सरकारच्या पुढाकारातून शिवरायांचे वाघनखं इंग्लंडमधून भारतात आणली जाताहेत. तुम्हा-आम्हांसाठी ही गोष्ट अभिमानाची आहे. मात्र, आदित्यसाहेबांनी वाघनखांबाबतच शंका उपस्थित केली. वाघनखं खरी की खोटी, हे बघा असे त्यांचे म्हणणे आहे. हे बघण्यासाठी नेमके कोणाला गाठले पाहिजे हे त्यांनी सांगितलेले नाही. ते नाव आदित्य ठाकरे यांनी सांगावे, मी त्याला जाऊन गाठतो. त्याला हुडकूनही काढतो, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला.