वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:00 IST2025-04-23T07:59:25+5:302025-04-23T08:00:10+5:30
सुरुवातीला 'एनडीए'च्या परीक्षेची तयारी केली, पण त्यात यश आले नाही.

वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
उद्धव धुमाळे
पुणे : पानशेतजवळील रुळे गावचा शिवांश जगडे हा २२ वर्षीय तरुण पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाला. त्याचे वडील शेतकरी असून, आई शिवणकाम करते. मोठी बहीण वकील आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला शिवांश स्वकष्टातून यशाला गवसणी घालत देशात २६ वे स्थान पटकावले आहे.
या यशाबद्दल शिवांश म्हणतो, लहानपणापासूनच काही तरी चांगलं करण्याची जिद्द मनात होती. त्यानुसार मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. सुरुवातीला 'एनडीए'च्या परीक्षेची तयारी केली, पण त्यात यश आले नाही. मला पहिल्यापासून समाजसेवेची आवड होती. त्यामुळे नोकरी करायची तर, अशी ज्यातून मला समाजाला न्याय देता येईल. त्यांचे हक्क त्यांना मिळून देता येईल. यादृष्टीने विचार करताना मला एकच मार्ग दिसला तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा. त्यानुसार स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागलो.
नियोजनबद्ध अभ्यास करून मिळाले यश
घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे क्लासेसशिवाय अभ्यास करण्याचा निश्चय केला आणि नियोजनबद्ध अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेलो, असे शिवांश याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले. जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, अशी भावना यावेळी शिवांशने बोलून दाखविली.