‘शिवाई’ या ईलेक्ट्रिक बसचे मार्ग ठरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 11:46 AM2019-12-02T11:46:36+5:302019-12-02T11:49:03+5:30

पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापुरचा समावेश

The 'Shivai' electric bus route done | ‘शिवाई’ या ईलेक्ट्रिक बसचे मार्ग ठरले

‘शिवाई’ या ईलेक्ट्रिक बसचे मार्ग ठरले

googlenewsNext
ठळक मुद्देई-बससाठी निश्चित करण्यात आलेली ठिकाणे पुण्यापासून १७५ ते २४० किलोमीटर अंतरातील शहरांतर्गत वाहतुकीसाठी लांबपल्याच्या मार्गावरही अधिकाधिक ई-बस धावणार

पुणे : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या ‘शिवाई’ या ईलेक्ट्रिक बसचे मार्गांना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुण्यासह नाशिक, औरंंगाबाद, कोल्हापुर व बोरीवलीचाही समावेश करण्यात आला आहे. या पाचही ठिकाणी सध्या ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून बॅटरीवर धावणाऱ्या ई-वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. शहरांतर्गत वाहतुकीसाठी लांबपल्याच्या मार्गावरही अधिकाधिक ई-बस धावतील, याअनुषंगाने प्रयत्न केले जात आहे. देशात पहिल्यांदाच पुणे शहरात ‘पीएमपी’च्या ताफ्यात सर्वाधिक १५० ई-बस दाखल झाल्या आहेत. टप्याटप्याने ही संख्या चौपट होणार आहे. ‘एसटी’नेही पहिल्या टप्प्यात शंभर ई-बस भाडेतत्वावर घेण्याचे ठरविले आहे. त्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या ‘फेम इंडिया’ योजनेअंतर्गत एसटीला ५० ई-बस मिळणार आहे. यापार्श्वभुमीवर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या ई- बसचे मोठा गाजावाजा करून लोकार्पण करण्यात आले. ‘शिवाई’ असे या बसचे नामकरणही करण्यात आले. पण त्यानंतर निवडणुकांमुळे ही प्रक्रिया मंदावली होती. 
निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा वेग आला असून काही दिवसांपुर्वी मुंबई ते पुणेदरम्यान ई-बसची चाचणीही घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतुक संस्थे (सीआयआरटी) कडूनही या सेवेला हिरवा कंदील आहे. एकदा बसची बॅटरी चार्जिंग केल्यानंतर ही बस किमान ३०० किमीचा पल्ला गाठू शकते. त्यानुसार एसटीने प्राथमिक मार्ग निश्चित केले आहेत. प्रामुख्याने पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापुर व बोरीवली या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे. बसची सुरूवात आणि बसचे ठिकाण, अशा दोन ठिकाणी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही ठिकाणी चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरच प्रत्यक्ष मार्गावर बस धावू शकेल. तसेच ई- बस भाडेतत्वावर घेतल्या जाणार असून या सर्व प्रक्रियेसाठी दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
------------------
ई-बससाठी निश्चित करण्यात आलेली ठिकाणे पुण्यापासून १७५ ते २४० किलोमीटर अंतरातील आहेत. त्यामुळे ई-बसच्या दृष्टीने पहिल्या टप्प्याने पुण्यालाच अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसारच ठिकाणांची निश्चिती करण्यात आल्याचे समजते. पुण्यामध्ये शंकरशेठ रस्त्यावरील एसटीच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ई-बसचे संभाव्य मार्ग -
- पुणे-नाशिक-पुणे
- पुणे-औरंगाबाद-पुणे
- पुणे-कोल्हापुर-पुणे
- पुणे-बोरीवली-पुणे
- नाशिक-बोरीवली-नाशिक
-----------------------

Web Title: The 'Shivai' electric bus route done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे