शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:11 IST2025-07-15T06:11:10+5:302025-07-15T06:11:32+5:30
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shivsena: सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी

शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाचा वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सुटण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हाण देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर अंतिम सुनावणी ऑगस्टमध्ये घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.
पालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर उद्धव यांनी दोन वर्षांपासून प्रलंबित शिवसेना व धनुष्यबाणाच्या याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. सूर्य कांत व न्या. जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
२० ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी
रोस्टर बघितल्यानंतर २० ऑगस्ट ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अंतिम सुनावणी दोन-तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर मंगळवारपासून न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी ठाकरे यांच्या अर्जावर सुनावणी झाली.
सोक्षमोक्ष लावावाच लागेल : कोर्ट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता या प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा, अशी विनंती उद्धवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. त्याला शिंदेसेनेचे वकील नीरज किशन कौल यांनी कडाडून विरोध केला.
याचिकाकर्त्यांनी ही याचिका आत्ताच का दाखल केली? ते दोन वर्षांपासून झोपले होते का? असा प्रश्न केला. पण खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. आतापर्यंत जे झाले ते झाले. आता दोन वर्ष संपलेत. आम्हाला सोक्षमोक्ष लावावाच लागेल, असे खंडपीठ म्हणाले.
सिब्बल म्हणाले की, २०२३ मध्ये विधानसभा अध्यक्षांनी शिंदेसेनेला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घटनापीठाच्या निकालाच्या विरोधात आहे. त्यावर न्या. सूर्यकांत म्हणाले, इतर खटल्यांच्या सुनावणीमध्ये अडथळे येऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागेल.