...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 09:18 PM2022-01-23T21:18:02+5:302022-01-23T21:18:22+5:30

आम्ही सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली : उद्धव ठाकरे

shiv sena uddhav thackeray speaks about why Alliance with congress ncp criticize bjp over hindutwa | ...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

Next

"भाजपने पोकळ हिंदुत्व केलं आहे. विविध राज्यात सोईचे राजकारण करतात. त्यांनी हिंदुत्वासाठी काही राज्यात गोवंश हत्या बंदी केली, तर काही राज्यात ही सुरू ठेवली आहे. हे म्हणतात आम्ही लोकशाहीचा अपमान केला. पण, तुम्ही आम्हाला गुलामाची वागणूक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

युतीमध्ये २५ वर्षे सडली हे माझं मत आजही कायम आहे. शिवसेना प्रमुख म्हणायचे, राजकारण म्हणजे गजकरण आहे, जेवढं खाजवावं तेवढी खाज आहे. हे राजकारणातले गजकरणी आहेत. ते राजकारण म्हणून काहीही खाजवतायत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "आजचं यांचं जे हिंदुत्व आहे, ते सत्तेसाठी अंगीकारलेलं एक ढोंग आहे. वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव असतं तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलंय. २५ वर्ष यांना पोसल्यानंतर हे लक्षात आलं हे दुर्देव आहे. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. ते कदापी सोडणार नाही. भाजपला आम्ही सोडलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही," असंही ते म्हणाले. 

"अमित शाह एकदा पुण्यात म्हणाले होते, एकट्यानं लढून दाखवा. आमची एकट्यानं लढायची तयारी आहे. आम्ही वीरासारखे लढू. हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि पक्ष जसे राजकारणात भिडतात तसं भिडा. आव्हान द्यायचं आणि मागे ती ईडीची पिडा लावायची, इन्कम टॅक्सची पिडा लावायची, है शौर्य नाही. त्यांनी तशी आव्हानं द्यायची गरज नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले. यांची पद्धत म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं. एकेकाळी यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं. तेव्हा यांनी प्रादेशिक पक्षांशी युती केली. आमच्याशी केली, अकाली दलाशी केली, सर्व पक्ष सोबत घेऊन अटलबिहारी वाजपेंयींनी सरकार चालवलं. आम्ही साथ दिली, काहीही करा पण जो भगवा फडकलाय तो उतरू देऊ नका. पण त्या भगव्याचं रंग पुसट होत चाललाय. हे हिंदुत्वाचा वापर स्वार्थासाठी करू लागलेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Web Title: shiv sena uddhav thackeray speaks about why Alliance with congress ncp criticize bjp over hindutwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.