मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मविआतील मित्रपक्षांमधील कुरघोडी समोर येत होती. त्यातच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष मजबुतीसाठी स्वबळावर लढण्याचा सूर ठाकरे गटाने आवळला आहे. मात्र महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेतला गेला असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानानं मविआत फूट पडल्याचं दिसून आले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून या मविआवर भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेनेने (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय, हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला आहे असा दावा त्यांनी केला. नुकतेच आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. शिंदेसेनेनेही ठाकरे गटाला फडणवीसांच्या भेटीवरून टोला लगावला होता.
जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणणारे, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील, अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात पहिल्यांदा पाहिली. लोकांनी ज्यांना झिडकारले, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आणि मतदारांनी त्यांचा कचरा केला. शिव्या, शापाशिवाय ते काय बोलत नव्हते. पहिले सरकार स्थापन झाल्यापासून शिव्या, शाप आणि आरोप त्याशिवाय दुसरे त्यांनी काहीच केलेले नाही. तर आम्ही आरोपांना आरोपांनी उत्तरे दिली नाहीत, आम्ही कामातून उत्तर दिले असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या फडणवीस भेटीवर घणाघात केला.
"काय होईल ते होईल, आम्ही स्वबळावर लढणार"
"मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचंच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचं ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत असं सांगत खासदार संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिला. तर त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण आहोत. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर एकत्रित राहायला हवे होते, असे माझे मत आहे. हा निर्णय फार घाईने घेतला, असे दिसत आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.