Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतोय, करत राहीन. पण, लोकसभा निवडणुकीआधी उमेदवार मिळत नव्हता तेव्हा शिंदे गटाकडून शिरसाट यांनी काही लोकांना पाठवले होते. आमच्याकडे त्यांना घेऊन या असे सांगितले. त्याशिवाय भाजपाचे लोक माझ्याकडे खूप वेळा येऊन गेलेत. दिल्लीतून अनेक मान्यवरांशी ऑफर होती. तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला खासदार करतो, मंत्री करतो. अलीकडे मला हरिभाऊ बागडेंसारखे राज्यपाल करण्याचीही ऑफर देण्यात आली होती, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर शिंदे गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. खासदार संजय राऊत यांनी दौरा केलेल्या पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राज्यभरातील हजारो कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहे. यातच शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन धनुष्यबाण, ऑपरेशन टायगर राबवण्याची तयारी सुरू आहे. ठाकरे गटातील अनेक खासदार, आमदार शिंदेसेनेत येणार असल्याबाबत दावे केले जात आहेत. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
ऑफर स्वीकारली असती तर खैरे आता खासदार झाले असते
लोकसभेची निवडणूक होती आणि चंद्रकांत खैरे त्या अर्थाने जेष्ठ नेते आहेत. पक्ष वाढवायचा होता. त्यामुळे माझे काम होते की, त्यांना ऑफर देणे. चंद्रकांत खैरे यांनी आमच्याकडून लोकसभेची निवडणूक लढवली असती तर ते आता खासदार झाले असते. मात्र, त्यावेळी त्यांनी आमची ऑफर नाकारली, परिणाम असा झाला की त्यांच्याच विरोधात आम्हाला लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. आमचे संदिपान भुमरे हे लोकसभा लढले आणि निवडून आले, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे. भलेही मला काही मिळालं नाही तरी चालेल. राजकारणात काहीही होऊ शकते. एकनाथ शिंदे आता हळूहळू बाजूला चाललेत. दोन्ही नेते आहेत. उद्धव ठाकरे खूप बुद्धिवान आहेत. हे सगळे फाटाफूट करून चाललेत. त्यांना स्वत:च्या थोबाडीत मारल्यासारखे होईल असं सांगत उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस एकत्रित येऊ शकतात का यावर चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे.