“उद्धव ठाकरेंना भाजपाने घेतले पाहिजे ना? या हतबलतेला संजय राऊत जबाबदार”; शिंदेसेनेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:21 IST2025-01-24T19:21:34+5:302025-01-24T19:21:39+5:30

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: पक्ष शेवटच्या घटका मोजत असला तरी उद्धव ठाकरेंची अशी धारणा आहे की, संपूर्ण महाराष्ट्र हातातून गेला तरी चालेल. पण मुंबई महापालिका हातातून जाऊ नये, अशी टीका शिंदेसेनेने केली आहे.

shiv sena shinde group sanjay shirsat replied uddhav thackeray over criticism on eknath shinde | “उद्धव ठाकरेंना भाजपाने घेतले पाहिजे ना? या हतबलतेला संजय राऊत जबाबदार”; शिंदेसेनेचा पलटवार

“उद्धव ठाकरेंना भाजपाने घेतले पाहिजे ना? या हतबलतेला संजय राऊत जबाबदार”; शिंदेसेनेचा पलटवार

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: हिंदुहृदयसम्राट दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने मेळावे घेतले आणि जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावरही हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपासह शिवसेना शिंदे गटातील नेते उत्तर देत आहेत.

पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर टायर जाळणारे, बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत. मला ही जागा शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. जोपर्यंत शिवसैनिक सोबत आहे तोपर्यंत ही जागा सोडणार नाही. पण, बाळासाहेबांचे विचार सोडले असे एकही निष्ठावंत म्हणाला, तर हे पदही सोडेन. आम्ही हरूनही जनता आमचे स्वागत करते. निवडणुकीत बेकायदेशीरपणे यंत्रणा वापरल्या. महापालिकेनंतर तुमचे काय होते ते पाहा. अडीच वर्ष मुख्यमंत्री केले. आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. मंत्रीपद नाही मिळाले, गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू गावात जाऊन बसू, असा टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

उद्धव ठाकरे जातील पण भाजपाने त्यांना घ्यायला हवे ना?

उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील पण भाजपाने त्यांना घेतले पाहिजे ना? त्यांचे प्रयत्न होते आणि आताही सुरु आहेत. कोणाकोणाच्या माध्यमातून फोन गेले आहेत हे आम्हाला सर्व माहिती आहे. आता सर्व टोमणे मारून झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अभ्यास करून एक नवीन टोमणा काढला आहे, ‘रुसू बाई रुसू, गावी जाऊन बसू’. पण तुम्हाला काय करायचे? उद्धव ठाकरे कोणाला कोणती उपमा देत आहेत? अमित शाह यांच्याबरोबर तुमचेही नमस्कार करताना फोटो आहेत. ते शेअर केले तुमची काय अवस्था होईल? उद्धव ठाकरेंची अशी धारणा आहे की, संपूर्ण महाराष्ट्र हातातून गेला तरी चालेल. पण मुंबई महापालिका हातातून जाऊ नये. आता उद्धव ठाकरे यांचा पक्ष शेवटची घटका मोजत आहे हे या महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल, या शब्दांत संजय शिरसाट यांनी पलटवार केला. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली हे त्यांनी सांगावे. सहज जाऊन भेट घेतली असे नाही. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे हतबलता व्यक्त केली असेल. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावरील हतबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार आहेत. आजही त्यांची मानसिकता बदलत नाहीत. ते पक्ष वाचवण्यापेक्षा दुसऱ्यांवर टीका करण्यात धन्यता मानतात, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. 
 

Web Title: shiv sena shinde group sanjay shirsat replied uddhav thackeray over criticism on eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.