“संजय राऊतांनी विधानसभा, लोकसभा लढली का, तळागाळात जाऊन काम केले का”; शिंदेसेनेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:57 IST2025-02-12T15:55:50+5:302025-02-12T15:57:22+5:30
NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. गेल्या ३ महिन्यांत मातोश्रीवर कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांनी केली.

“संजय राऊतांनी विधानसभा, लोकसभा लढली का, तळागाळात जाऊन काम केले का”; शिंदेसेनेची टीका
NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: सरहदच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर राजकारणाला योग्य दिशा देण्याचेही काम केले, अशा शब्दांत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शरद पवार यांच्यावर टीका केली. याला आता शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिले.
उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. यांच्या विरहित कार्यक्रम केला तर ते गद्दार. गद्दार शब्द चिटकवण्याची त्यांच्याकडे स्पर्धा लागली आहे. चांगल्या माणसाने चांगले काम केलेले त्यांना आवडत नाही. मराठी महिला म्हणून प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. यांना हे कळत नाही. कोण आहे संजय राऊत. काय अस्तित्व आहे. कधी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा लढलीय का, त्यांना काय माहीत आहे. भाषण करणे वेगळे आणि तळागाळात जाऊन काम करणे वेगळे. ते फक्त पोपटपंची करतात, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
संजय राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज आहेत
संजय राऊतांवर उद्धव ठाकरे नाराज आहेत. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, हे आश्चर्य आहे. शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. तो महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचा सत्कार आहे. त्याचा बहुमान एकनाथ शिंदे यांना मिळाला याचा अभिमान आहे. शिवसेना प्रमुख स्मारक ट्रस्टचे अध्यक्षपद काढू नका, हे सांगण्यासाठी हे लोक मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. विनवण्या करण्यासाठी फिरत असतात, अशी खोचक टीकाही संजय शिरसाट यांनी केली.
तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात
एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुखांचे विचार पेलणारा नेता आहे. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचा गौरव केला. तुम्ही फक्त दलाली करत आहात. टीका करून दिवसाची सुरुवात कशी करायची, इतरांना कसे वाईट बोलायचे हेच काम आता त्यांचे राहिले आहे. महाविकास आघाडी राहिली कुठे. यांना काँग्रेस विचारते कुठे, राष्ट्रवादी यांना विचारते कुठे. तीन महिन्यात मातोश्रीला कोणी गेलंय का. हेच सिल्व्हर ओकवर जातात. हे आता एकटेच पडणार आहेत, असे सांगत शिरसाट यांनी हल्लाबोल केला.
अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचे काम केले
अनेक मुख्यमंत्र्यांच्या भेटी शरद पवार यांनी घेतल्या. महाराष्ट्राच्या हिताची चर्चा त्यांनी केली. संजय राऊत यांना चर्चा नको. यांना फक्त राजकारण पाहिजे. अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांना डांबून ठेवण्याचे काम केले. संजय राऊत हे राजकारणातील खलनायक आहेत. शकुनी आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडी असेल किंवा आम्ही फुटण्यास ते कारणीभूत झालो, असे शिरसाट म्हणाले.