Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंना कोण ओळखतं? बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख...”; शिवसेना आमदाराचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 15:03 IST2023-03-06T15:03:20+5:302023-03-06T15:03:38+5:30
Maharashtra News: सुषमा अंधारेंना बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राने व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच दुर्दैवी आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंना कोण ओळखतं? बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख...”; शिवसेना आमदाराचा पलटवार
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतील गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट, केंद्रातील मोदी सरकार यांच्यावर सडकून टीका केली. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेवेळी अनेकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यामध्ये संजय कदम यांनीही शिवबंधन बांधले. यावरून संजय कदमांसारखा दहा पट ताकदीचा माणूस मिळाला आहे, असे विधान सुषमा अंधारे यांनी केले होते. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी सुषमा अंधारे यांच्या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
सुषमा अंधारेंना कोण ओळखते?
सुषमा अंधारेंना कोण ओळखते. गेल्या सहा महिन्यांत त्या पुढे आल्या आहेत. पण, सुषमा अंधारेंना बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राने व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच दुर्दैवी आहे. सुषमा अंधारेंनी बाळासाहेब ठाकरेंचा ७५ वर्षांचा म्हातारा, असा उल्लेख केला होता. अशा व्यक्तीला तुम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देता, त्यांना कुठे खेड, रामदास कदम आणि योगेश कदम माहिती आहे. अशा व्यक्तींना प्रतिसाद देणे योग्य वाटत नाही. त्यांना राजकीय गंध अजिबात नाही, या शब्दांत योगेश कदम यांनी पलटवार केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शाब्दिक उत्तर देण्याची गरज नाही. शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून, ती वाढवतोय. टीकेला उत्तर देण्यापेक्षा तळागाळातील विकासकामे करुन जनतेची मने जिंकायची, आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असणारा भगवा झेंडा दापोली मतदारसंघात फडकवत ठेवायचा, हा आमचा उद्देश आहे, असा निर्धार योगेश कदम यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"