“ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात”; शिंदे गटाच्या नेत्याचे कोणाबाबत विधान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 20:23 IST2025-01-23T20:20:44+5:302025-01-23T20:23:11+5:30
Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल, असा दावा शिंदेसेनेतील नेत्यांनी केला आहे.

“ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात”; शिंदे गटाच्या नेत्याचे कोणाबाबत विधान?
Shiv Sena Shinde Group News: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण राबवले जाऊ शकते. ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसतच असून, राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा मोठे दावे केले आहेत.
उद्यापासून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडायला रत्नागिरीतून सुरुवात होत आहे. संजय राऊतांनी जे काही आरोप केले, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात रत्नागिरीतून प्रत्युत्तर देऊन करणार आहे. ठाकरे गटाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल. संजय राऊत यांना नियती धडा शिकवेल, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
ते स्वतः CM फडणवीसांच्या संपर्कात, सारखा फोन करतात
बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत चांगली भूमिका मांडतील, त्यांचे समर्थन आम्ही करणार आहोत. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, ते माझ्या नावाचा वापर करत आहेत. असल्या बालिश पद्धतीने माझ्यात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणीही फूट पाडू शकत नाहीत. दावोसला असताना ज्या लोकांनी माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, माझा राजकीय अस्त व्हावा, यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबाबत मी एवढेच सांगू इच्छितो की, ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. वारंवार त्यांना फोन करत आहेत. कालही कॉल केला होता. आमचे आता पुढे राजकीय भवितव्य काय असेल, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले, असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला.
दरम्यान, सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी उद्योगमंत्री झालो. दावोसला जाता आले. गेल्या दोन वर्षात आम्ही सुमारे ७ लाख कोटी रुपयांचे एमओयू करण्यात यशस्वी झालो. आज तीच प्रथा आम्ही कायम ठेवली. सुमारे १५ लाख ७० हजार कोटींचे MOU आम्ही महाराष्ट्रासाठी केले. उद्योगमंत्री म्हणून समाधानी आहे, असे उदय सामंत यांनी नमूद केले.