मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:27 IST2025-08-23T13:22:26+5:302025-08-23T13:27:45+5:30

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: अमित ठाकरे यांनी भाजपा नेते, मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेल्याची म्हटले जात आहे.

shiv sena shinde group minister uday samant meets sharad pawar | मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?

मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: तुम्ही जर प्रभाग रचनेचा सगळ्यांनी मिळून अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की, प्रभाग रचनेचे काही नियम आहेत ते कोणालाही डावलता येत नाहीत. जसे मतदार यादीत सगळे लोक सांगतात की दुबार मतदार नोंदणी झालेली आहे किंवा घोटाळा झाला आहे. ते बदलण्याचे अधिकार निवडणूक आयोगाने दिले आहेत. पंचायत निवडणुका आपल्या हातातून गेल्यात अशी जेव्हा आपली कहाणी होते. त्यावेळी कुठच्याही गोष्टीचा खापर हे कोणावर तरी फोडायचे असते, म्हणून काही लोक प्रभाग रचनेवर खापर फोडत आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला दिले.

सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांंनी भाजपा नेते, मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. यानंतर उदय सामंत यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना या भेटीचे कारण तसेच अन्य राजकीय प्रश्नांवर उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार आहेत. त्या संदर्भात बैठक होती. या कमिटीचे कोषाध्यक्ष, विश्वस्त आणि मी आम्ही सगळे या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित होतो. ११ सप्टेंबरला शरद पवार यांनी यशवंत नाट्यमंदिर येथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक बैठक आयोजित केलेली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून याचा मी एक भाग आहे. यामुळे मला शरद पवार यांनी या ठिकाणी बोलवले. यात कुठलीही राजकीय बाब नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

आंदोलन करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक दिली असताना राज्य सरकारने मराठा समाजाच्याप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना केली आहे. या समितीत उदय सामंत यांचाही समावेश आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारच्या समोर आहेत. परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की, मराठा आणि ओबीसी समाज दोन्ही घटक महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे जरांगेंच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील तर त्या चांगल्या पद्धतीने सरकारला कशा पुढे नेता येतील ते बघावे लागेल. आंदोलन करणे किंवा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये मला पडायचे नाही. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असे उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, ईव्हीएमच कारण जे होते, ते बेस्ट पतपेढी निवडणुकीत नेस्तनाबूत झाले. कारण बॅलेटवर निवडणुका घेऊन त्यांना भोपळाही फोडता आला नाही. १२ हजार मराठी मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले. त्यांना २ हजार मतेही मिळवता आली नाहीत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जात असताना कारण कुठच शोधायचे? स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्याने कोणावर तरी खापर फोडावे लागते ते आता त्यांनी प्रभागावर फोडले आहे, या शब्दांत उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

 

Web Title: shiv sena shinde group minister uday samant meets sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.