“आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली!”; मानद डॉक्टरेट प्रदान झाल्यावर मंत्री उदय सामंत भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 20:30 IST2025-02-01T20:27:37+5:302025-02-01T20:30:35+5:30

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मंत्रिपदाच्या काळात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण उदय सामंत यांनी यावेळी करून दिली.

shiv sena shinde group minister uday samant emotional after being awarded honorary doctorate by ajinkya d y patil university | “आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली!”; मानद डॉक्टरेट प्रदान झाल्यावर मंत्री उदय सामंत भावूक

“आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली!”; मानद डॉक्टरेट प्रदान झाल्यावर मंत्री उदय सामंत भावूक

Shiv Sena Shinde Group Uday Samant News: राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानाने भावूक होत उदय सामंत यांनी आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला विद्यापीठाचे संस्थापक डॉ. अजिंक्य डी.वाय. पाटील, विद्यापीठाचे अधिकारी, विद्यार्थी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉक्टरेट मिळाल्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना उदय सामंत म्हणाले की, आजपासून माझ्या नावासमोर 'डॉ.' लागले आहे. माझ्या आई-वडिलांची इच्छा होती की, मी एमबीबीएस करून डॉक्टर व्हावे, पण नियतीने मला वेगळ्या मार्गावर आणले. समाजासाठी आणि राज्यासाठी कार्य करताना आज विद्यापीठाने माझ्या कार्याची दखल घेतली, याचा मला अभिमान वाटतो, असे सांगताना उदय सामंत यांनी आपल्या भाषणात राजकीय प्रवासाचा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण त्यांनी करून दिली. 

दुसऱ्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांसाठी मी देव बनलो

कोरोना काळात परीक्षा घ्यायच्या की नाही, हा प्रश्न उभा राहिला होता. तेव्हा मी विद्यार्थ्यांच्या मतांचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी माझे आभार मानले होते. तो निर्णय माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक होता, असे उदय सामंत म्हणाले. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर दुसऱ्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांसाठी मी देव बनलो. अनेक विद्यार्थ्यांना उदय सामंत कळायला लागला. आणि जिल्ह्याच्या कानाकोपर्यात गेल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री आला. हेच सांगण्याऐवजी विद्यार्थी सांगायला लागले की, परीक्षा रद्द करणारा मंत्री आला. आणि ती जी काही मला प्रसिद्धी मिळाली त्या ऐतिहासिक निर्णयानंतर त्याला तोड कुठच्याही माझ्या निर्णयामध्ये येऊ शकत नाही. म्हणून मला असे वाटते की, तो ज्यावेळी निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या हिताचा होता विद्यार्थ्यांच्या हिताचा होता, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

परदेशातील मराठी मुलांना मातृभाषेचा अभिमान वाटावा

उद्योग मंत्री म्हणून महाराष्ट्रात रोजगार निर्मितीवर भर देत असल्याचे सांगत त्यांनी पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे गुंतवणूक करार (MOU) केले असल्याचे जाहीर केले. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्यासाठी अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाबरोबर विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. माझी इच्छा आहे की, परदेशातील मराठी मुलांना मातृभाषेचा अभिमान वाटावा आणि ती सहज शिकता यावी. यासाठी विद्यापीठाबरोबर लवकरच पाऊले उचलली जातील.

दरम्यान, या विद्यापीठाने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कार दिले आहेत. अशा प्रतिष्ठित संस्थेकडून सन्मान मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. राजकारणाची पार्श्वभूमी नसताना तसेच घरात कोणीही साधे ग्रामपंचायत सदस्यही नसताना आपण हे यश गाठू शकलो. कारण राज्यातील आणि रत्नागिरीतील जनता माझ्या पाठीशी होती अशी आठवण सांगताना आपण ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्राचे नावलौकिक आपल्यामुळे वाढले पाहिजे या भावनेतून काम करा, असा संदेश ही उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिला. हा सन्मान उदय सामंत यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन देण्यात आला. त्यांच्या या यशस्वी प्रवासासाठी विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
 

 

Web Title: shiv sena shinde group minister uday samant emotional after being awarded honorary doctorate by ajinkya d y patil university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.